राजीव शुक्ला हंगामी अध्यक्ष : आशिया चषकाआधीच बीसीसीआयमध्ये मोठी उलथापालथ
वृत्तसंस्था/ मुंबई
आशिया चषक स्पर्धेआधीच बीसीसीआयमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचे पहायला मिळत आहे. शुक्रवारी रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, पुढील निवडणुकीपर्यंत उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, अध्यक्षपदाची निवडणूक सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी जुलैमध्ये 70 वर्षांचे होतील. बीसीसीआयच्या नियमांनुसार, कोणत्याही अधिकाऱ्याला वयाच्या 70 व्या वर्षानंतर पद सोडावे लागते. अशा परिस्थितीत बिन्नी हे या पदावर राहण्यास अपात्र ठरतील. दरम्यान, राजीव शुक्ला हे आता हंगामी अध्यक्ष म्हणून काम करतील. शुक्ला हे 2020 पासून बीसीसीआयमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. बुधवारी झालेल्या बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत त्यांनी हंगामी अध्यक्षपद स्वीकारले. दरम्यान, बिन्नी यांना 2022 मध्ये टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जागी बीसीसीआयचे अध्यक्ष बनवण्यात आले. सौरव गांगुली 2019 ते 2022 पर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष होते. बीसीसीआयची जबाबदारी स्वीकारणारे बिन्नी हे तिसरे माजी क्रिकेटपटू आहेत.









