गुंता संपुष्टात, पाकिस्तानात होणाऱ्या स्पर्धेतील सामने भारत तर भारतातील स्पर्धेत होणारे सामने पाक तटस्थ ठिकाणी खेळणार
वृत्तसंस्था/दुबई
पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा गुंता अखेर गुऊवारी संपुष्टात आला असून आयसीसीने जाहीर केले आहे की, भारत 50 षटकांच्या सामन्यांच्या या स्पर्धेतील आपल्या लढती यजमान देश पाकिस्तानऐवजी तटस्थ ठिकाणी खेळेल. तोडग्यानुसार, भारतात 2027 पर्यंत होणाऱ्या स्पर्धांसाठी अशीच व्यवस्था पाकिस्तानलाही लाभणार आहे. 2028 च्या महिला टी-20 विश्वचषकापर्यंत ही व्यवस्था विस्तारित होईल. सदर स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे. भारत कुठे सामना खेळेल याबाबत कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नसली, तरी भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये होण्याची शक्यता आहे. ‘आयसीसी मंडळाने 2024 ते 2027 या कालावधीतील आयसीसी स्पर्धांमध्ये खेळविले जाणार असलेले भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे सर्व सामने (जे भारत किंवा पाकिस्तानमध्ये आयोजित केले जातील) स्पर्धेच्या यजमान देशाने प्रस्तावित केलेल्या तटस्थ ठिकाणी आयोजित करण्यास मान्यता दिलेली आहे’, असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. या व्यवस्थेत पुढील वर्षी भारतात होणारी महिला विश्वचषक स्पर्धा आणि 2026 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्याकडून संयुक्तपणे आयोजित केली जाणार असलेली टी-20 विश्वचषक स्पर्धा यांचा समावेश असेल.
भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने बहुतेक करून संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळविले जातील. भारतात होणाऱ्या महिलांच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचा विचार करता त्यातील भारत-पाकिस्तान सामना श्रीलंकेत होऊ शकतो, असे एका सूत्राने सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. 2008 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळलेला नाही. पाकिस्तानला जाण्यासाठी भारत सरकारची मंजुरी आवश्यक असून स्थिती जैसे थे असावी यावर केंद्र सरकार ठाम आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, 2025 चे वेळापत्रक लवकरच निश्चित केले जाईल, असे आयसीसीने सांगितले आहे. अध्यक्ष ग्रेग बार्कले यांच्या नेतृत्वाखालील मागील मंडळाच्या कार्यकाळाच्या दरम्यान खेळाच्या प्रशासकीय मंडळाने या वादग्रस्त विषयावर दीर्घकाळ मौन पाळल्यानंतर पडद्यामागे चर्चेची मालिका झाली होती. त्यानंतर हा निर्णय अपेक्षित होता. बार्कले यांचे उत्तराधिकारी जय शाह यांनी 1 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारला असून पाकिस्तान क्रिकेट मंडळ, बीसीसीआय आणि प्रसारकांसह सर्व संबंधित घटकांसाठी या स्पर्धेच्या आयोजनाच्या दृष्टीने वेळ फार कमी राहिला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी शेवटची 2017 मध्ये ब्रिटनमध्ये खेळविण्यात आली होती.
गुऊवारची घोषणा म्हणजे शाह यांच्या कार्यकाळातील पहिलाच मोठा निर्णय आहे. बीसीसीआयची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिलेली असताना पीसीबीने तटस्थ ठिकाणांची ‘एकतर्फी’ व्यवस्था करण्यास संमती नाकारल्यामुळे प्रकरण ताणले गेले होते. पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी यांच्या नेतृत्वाखाली पीसीबीने स्थानिक लोकांसमोर आपल्या चेहरा लपविण्याचा प्रसंग येऊ देणार नाही, असा निर्धार केला होता. गेल्या वर्षी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठवणाऱ्या पीसीबीने हायब्रीड मॉडेलला स्पष्टपणे विरोध केला होता. परंतु शेवटी त्यांनी त्यास सहमती दर्शविली. पीसीबीने यापूर्वी सूचित केले होते की, हायब्रीड मॉडेलची भारतीय मागणी पूर्ण करण्याच्या बदल्यात त्यांना वार्षिक महसुलात मोठा वाटा हवा आहे. परंतु त्यावर चर्चा झाली आहे का किंवा ती मागणी स्वीकारली गेली आहे का, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दोन गटांत विभागलेले आठ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.









