बेंगळूर चेंगराचेंगरी प्रकरण मुद्दा महत्वाचा ठरणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बीसीसीआयची 28 वी सर्वोच्च परिषदेची बैठक आज शनिवारी 14 जून रोजी दुपारी 4 वाजता व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. या बैठकीत बेंगळूरमध्ये आरसीबीच्या आयपीएल ट्रॉफी विजयोत्सवावेळी चिन्नास्वामी दुर्घटनेवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. तसेच भविष्यातील आयपीएल विजेतेपद साजरा करण्यासाठी नियमावलीची रूपरेषा देखील तयार केली जाईल. बीसीसीआयच्या या बैठकीत चेंगराचेंगरी, देशांतर्गत क्रिकेटचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.
या बैठकीच्या मुख्य विषयांपैकी एक म्हणजे चेंगराचेंगरीची दुर्घटना, ज्यामुळे आयपीएलची प्रतिष्ठा देखील खराब झाली आहे. बीसीसीआय आरसीबी मालकांवर कारवाई करेल का, याकडे सर्वांचे लक्ष्य वेधले आहे. या बैठकीमध्ये याव्यतिरिक्त, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी, विजयोत्सवाच्या स्वरूपाबाबत स्पष्ट नियम तयार केले जातील. आगामी 2025-26 च्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाचे वेळापत्रक, खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांसाठी आचारसंहिता, बीसीसीआय कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धा, भत्त्याचे नियम आणि इतर मुद्दे बैठकीच्या अजेंड्यावर आहेत.









