सलील अंकोलाच्या जागी नवीन सदस्याची वर्णी लागण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बीसीसीआयने सोमवारी पाच वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती सदस्यांपैकी एकाची जागा घेण्यासाठी अर्ज मागविलेले असून माजी वेगवान गोलंदाज सलील अंकोला हा समितीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण अध्यक्ष अजित आगरकर आधीच पश्चिम विभागाचे प्रतिनिधीत्व करत आहे.
बीसीसीआयने आपल्या वेबसाइटवर ही जाहिरात टाकली आहे. त्यात मागील काही वर्षांपासून लागू असलेल्या आवश्यक पात्रतेच्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सदर व्यक्तीने एक तर 7 कसोटी किंवा 30 प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत. 10 एकदिवसीय सामने किंवा 20 प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव असल्यास देखील अर्ज विचारात घेतले जातील, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी आहे.
सध्या पाच सदस्यीय निवड समितीमध्ये अजित आगरकर (अध्यक्ष, मुंबई, पश्चिम विभाग), एस. शरथ (तामिळनाडू, दक्षिण विभाग), एस. एस. दास (विदर्भ, मध्य विभाग), सुब्रतो बॅनर्जी (बंगाल-बिहार, पूर्व विभाग) आणि सलील अंकोला (मुंबई, महाराष्ट्र, पश्चिम विभाग) यांचा समावेश आहे. अजित आगरकर वगळता इतर चारही जणांनी 31 डिसेंबर, 2023 रोजी त्यांचा एका वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांच्याशी एका वर्षाचा करार करण्यत आला होता, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले.
तांत्रिकदृष्ट्या एकाच विभागातील दोन निवड समिती सदस्य असू शकत नाहीत असा कोणताही नियम नाही, परंतु बीसीसीआयने नेहमी निवड समितीत प्रत्येक विभागातील एक सदस्य ठेवण्याची परंपरा कायम ठेवली आहे आणि चेतन शर्माला हटवल्यानंतर उत्तर विभागाचा कोणताही प्रतिनिधी समितीत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यासंदर्भात मुलाखतीसाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. परंतु नवीन सदस्य निवड समितीत ‘आयपीएल’दरम्यान सामील होईल अशी अपेक्षा आहे. कारण इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर निवड समितीची बैठक होणार नाही.









