देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासह कुटुंबासह प्रवास करण्यावरही बंदी : नियमांचे उल्लंघन केल्यासह कारवाईचा इशारा
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये आले आहे. बीसीसीआयने विशेषत: शिस्तीबाबत कठोर नियम केले आहेत. बीसीसीआयने टीम इंडियासाठी 10 नियम लागू केले आहे, जे प्रत्येक खेळाडूला पाळणे अनिवार्य असेल. याशिवाय बीसीसीआयने भारतीय संघातील स्टार कल्चरही बंद करण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे, देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारे संघातही निवड केली जाईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
बीसीसीआयने जारी केलेले नवीन नियम :
- देशांतर्गत सामन्यामध्ये खेळणे अनिवार्य – भारतीय खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावे लागेल. हे बंधनकारक करण्यात आले आहे. या आधारावर भारतीय संघातही खेळाडूंची निवड केली जाईल. जर एखाद्या खेळाडूला कोणत्याही कारणास्तव देशांतर्गत क्रिकेट खेळायचे नसेल तर ही माहिती बीसीसीआयला कळवावी लागेल. याशिवाय निवड समितीच्या अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागणार आहे. देशांतर्गत क्रिकेट खेळण्याबरोबरच खेळाडूंना तंदुरुस्तीही सांभाळावी लागणार आहे.
- कुटुंबासोबत मर्यादित कालावधीतच प्रवास – जर एखादा खेळाडू 45 दिवस परदेशी दौऱ्यावर राहिला, तर त्याची पत्नी आणि मुले दोन आठवडे त्याच्यासोबत राहू शकतात. या कालावधीत बीसीसीआय फक्त त्यांच्या राहण्याचा खर्च उचलेल. मुदत संपल्यानंतर खेळाडू कुटुंबाचा खर्च उचलेल.
- निर्धारित वजनाप्रमाणेच वस्तू घेता येणार – प्रवासादरम्यान खेळाडूंना जास्त सामान बाळगण्यास मनाई असेल. खेळाडू आता एका ट्रिपमध्ये 150 किलोपर्यंत सामान आणि सपोर्ट स्टाफ 80 किलोपर्यंत सामान वाहून नेऊ शकतात. जर कोणत्याही खेळाडूने या नियमाचे उल्लंघन केले तर त्याला स्वत: पैसे द्यावे लागतील.
- सराव सत्रादरम्यान उपस्थित असणे आवश्यक – आता सर्व खेळाडूंना नियोजित सराव सत्राच्या संपूर्ण कालावधीसाठी सराव सत्रात राहावे लागणार आहे. या नियमानुसार आता कोणताही खेळाडू लवकर सराव सत्र सोडू शकणार नाही.
- वैयक्तिक कर्मचाऱ्यांवर बंदी – कोणत्याही टूर किंवा मालिकेत वैयक्तिक कर्मचारी (जसे वैयक्तिक व्यवस्थापक, शेफ, सहाय्यक आणि सुरक्षा) वर बंदी असेल. यासाठी बीसीसीआयची परवानगी घेतल्याशिवाय कोणालाही सोबत ठेवता येणार नाही.
- सेंटर ऑफ एक्सलन्सला काहीही पाठवण्यापूर्वी खेळाडूंना संघ व्यवस्थापनाला कळवावे लागेल – खेळाडूंना आता बेंगळूरमधील सेंटर ऑफ एक्सलन्सला स्वतंत्र बॅग पाठवाव्या लागतील किंवा कोणतीही उपकरणे आणि वैयक्तिक वस्तू पाठवण्यापूर्वी संघ व्यवस्थापनाला कळवावे लागेल. वेगवेगळ्या व्यवस्थेमुळे कोणताही अतिरिक्त खर्च झाल्यास त्याची जबाबदारी खेळाडूची असेल.
- वैयक्तिक शूटची परवानगी दिली जाणार नाही – मालिका आणि वैयक्तिक दौऱ्यादरम्यान खेळाडूंना यापुढे वैयक्तिक शूट करण्याची परवानगी दिली जाणार नाही. या कालावधीत कोणत्याही खेळाडूला जाहिरात करता येणार नाही. खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
- सर्व खेळाडूंना एकत्र प्रवास बंधनकारक – सर्व खेळाडूंना एकत्र प्रवास करणे बंधनकारक असेल, मग ते सामन्यासाठी प्रवास करीत असतील किंवा सराव सत्रासाठी. खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसोबत प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
- बीसीसीआयच्या अधिकृत कार्यक्रमांना उपस्थित राहणे बंधनकारक – सर्व खेळाडूंना बीसीसीआयच्या अधिकृत शूट आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे बंधनकारक असेल. बीसीसीआयच्या स्टेकहोल्डर्सशी बांधिलकी राखण्यासाठी आणि खेळाला प्रभावीपणे प्रोत्साहन देण्यासाठी या भागीदारी आवश्यक आहेत.
- मालिका संपल्यानंतर घरी जाण्याची परवानगी – सामना किंवा मालिका संपेपर्यंत सर्व खेळाडूंना एकत्र रहावे लागणार आहे. यानंतर घरी जाण्याची परवानगी दिली जाणार आहे.









