आयडीएफसी बँकेचा बीसीसीआयशी करार : पुढील तीन वर्षात मिळणार 1000 कोटी
वृत्तसंस्था/ मुंबई
आगामी तीन वर्षात बीसीसीआयवर पैशांचा पाऊस पडणार आहे. मायदेशातील आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी बीसीसीआयला नवीन टायटल स्पॉन्सर मिळाला आहे. बीसीसीआयची टायटल स्पॉन्सरची डील आपल्या नावावर करण्यात आयडीएफसी फर्स्ट बँक यशस्वी ठरली. आयडीएफसीव्यतिरिक्त सोनी स्पोर्ट्सही बीसीसीआय टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत होती. मात्र, आयडीएफसी फर्स्ट बँकेने बाजी मारली. आता बीसीसीआयसोबत 3 वर्षांसाठी हा करार असणार आहे. या अंतर्गत बँकेला बीसीसीआयला प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी 4.2 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
आयडीएफसी फर्स्ट आता भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय सामने (महिला आणि पुरुष दोन्ही), तसेच इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी सारख्या देशांतर्गत क्रिकेट सामन्यांसाठी तसेच सर्व ज्युनियर क्रिकेट (19 आणि 23 वर्षांखालील) सामन्यांसाठी टायटल स्पॉन्सर असणार आहे. दरम्यान, शुक्रवारी मुंबईमध्ये बीसीसीआय टायटल स्पॉन्सरचा लिलाव पार पडला. सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आयडीएफसी फर्स्ट बँक टायटल स्पॉन्सर असल्याचे जाहीर केले गेले. पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसह या नव्या टायटल स्पॉन्सरशिपची सुरुवात होईल.
तीन वर्षासाठी करार
बीसीसीआय आणि आयडीएफसी फर्स्ट बँकमधील करार 1 सप्टेंबरपासून 3 वर्षांसाठी असेल. करारात भारतातील 56 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने असणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3 वर्षांमध्ये या करारातून बीसीसीआयच्या खिशात जवळपास 987 कोटी रुपये येणार आहेत. दरम्यान, टायटल स्पॉन्सर लिलावाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मोठमोठ्या कंपन्या या भारतातील द्विपक्षीय मालिकांच्या तुलनेत आयपीएल सामन्यांसाठी जास्त रस दाखवतात. मात्र, बोली लावणाऱ्या कंपन्याना आकर्षित करण्यासाठी बीसीसीआयने मूळ रक्कम कमी करून 2.4 कोटी ठेवली होती. पण या लिलावामध्ये आयडीएफसी व सोनी या दोनच कंपन्यांनी भाग घेतला. यामध्ये आयडीएफसीने बाजी मारताना पुढील तीन वर्षासाठी करार केला. याशिवाय, सोनी स्पोर्ट्स कंपनी अजूनही बीसीसीआयच्या मीडिया अधिकारांच्या शर्यतीत कायम असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
प्रतिक्रिया
पुढील तीन वर्षासाठी आयडीएफसी फर्स्ट बँक टायटल प्रायोजक असणार आहे. बीसीसीआयसाठी ही आनंदाची बाब आहे.
बीसीसीआय सचिव जय शाह









