वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी सुपरस्टार रजनीकांत यांना अहमदाबाद येथे 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे ‘गोल्डन तिकीट’ सादर केले. रजनीकांत ‘प्रतिष्ठित पाहुणे’ या नात्याने सदर स्पर्धेस उपस्थिती लावतील, असे बीसीसीआयने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले असून त्यात मानद सचिव जय शाह हे रजनीकांत यांना तिकीट देतानाचे छायाचित्रही जोडण्यात आले आहे.
गोल्डन तिकीट या बहुराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान कुठल्याही अडथळ्याविना प्रवेश करण्यास अनुमती देते. सदर स्पर्धा 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये 2019 च्या अंतिम फेरीत पोहोचलेले इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने सुरू होईल. गोल्डन तिकीट ही बीसीसीआयची सदर स्पर्धेसाठीची ‘प्रोमोशनल स्ट्रॅटेजी’ असून सदर तिकीट मिळणाऱ्यांना विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांदरम्यान अतिमहनीय व्यक्तींप्रमाणे वागवले जाईल.









