वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देशांतर्गत स्पर्धा भत्ता धोरण सुव्यवस्थित केल्यानंतर जानेवारीपासून न मिळालेले बीसीसीआयच्या सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांचे दैनिक भत्ते अखेर जारी केले जातील.
विद्यमान बीसीसीआय प्रवास धोरणानुसार, कर्मचाऱ्यांना अल्पकालीन प्रवासासाठी (चार दिवसांपर्यंत) प्रतिदिन 15,000 ऊपये आणि भारताने आयोजित केलेल्या आयसीसी स्पर्धा तसेच महिला प्रीमियर लीग, इंडियन प्रीमियर लीग यांच्याशी संबंधित दीर्घ प्रवासासाठी 10,000 ऊपये दिले जातात. प्रवासादरम्यान एक वेळचा आकस्मिक भत्ता 7500 ऊपये आहे. सुधारित धोरणानुसार, आकस्मिक भत्ता घटक काढून टाकण्यात आला आहे आणि कर्मचाऱ्यांना आता प्रवासातील त्यांच्या वेळेसाठी दररोज 10,000 ऊपये दिले जातील. आयपीएलचा कालावधी दोन महिन्यांपेक्षा थोडा जास्त असतो, तर आयसीसी स्पर्धा देखील किमान एक महिना चालते. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, कर कपातीनंतर दररोजचा भत्ता 6500 ऊपये होतो.
धोरणात सुधारणा होणार असल्याने वित्त, ऑपरेशन्स आणि मीडिया विभागासह बीसीसीआयच्या सर्व कर्मचाऱ्यांना आयपीएल आणि महिला प्रीमियर लीगसाठीचा दैनिक भत्ता देण्यात आलेला नाही परंतु आता धोरण तयार झाले आहे, त्यामुळे त्यांची थकबाकी लवकरच देण्यात येईल. ‘भत्त्यांच्या बाबतीत स्पष्ट धोरण आवश्यक होते. कारण काही कर्मचारी स्पर्धांदरम्यान मुंबई मुख्यालयाबाहेर काम करत असतानाही भत्त्यांचा दावा करत होते. आता सुधारित धोरण तयार झालेले असल्याने थकबाकी लवकरच मोकळी केली जाईल’, असे सूत्राने पुढे सांगितले.
संपूर्ण 70 दिवसांच्या आयपीएलसाठी प्रवास करणाऱ्या कर्मच्रायांना 10,000 ऊपयांचा दैनंदिन भत्ता मिळेल, ज्याची एकूण रक्कम 7 लाख ऊपये होते. आयपीएलदरम्यान मर्यादित प्रवास करणाऱ्या व्यक्तीला 70 दिवसांच्या भत्त्यातून फक्त 60 टक्के आणि अजिबात प्रवास न करणाऱ्या व्यक्तीला 70 दिवसांच्या रकमेच्या 40 टक्के रकमेवर दावा करता येईल. परदेशी प्रवासाबाबत बीसीसीआयच्या बहुतेक कर्मचाऱ्यांना दररोज 300 डॉलर्स दिले जातात.
दुसरीकडे, अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव यासारखे मानद् पदाधिकारी परदेश दौऱ्यांवर 1000 डॉलर्सचा दैनिक भत्ता मिळण्यास पात्र आहेत. त्यांना भारतात एका दिवसाच्या बैठकीसाठी 40000 ऊपये आणि देशांतर्गत कामानिमित्त अनेक दिवसांच्या दौऱ्यांसाठी 30000 ऊपये प्रतिदिन दिले जातात.









