वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाची रविवारी येथे होणाऱ्या खास सर्वसाधारण बैठकीमध्ये देवजित सैकिया आणि प्रभतेजसिंग भाटीया यांची अनुक्रमे सचिव आणि खजिनदारपदाची घोषणा अधिकृतपणे केली जाईल.
बीसीसीआयचे सचिव आणि खजिनदारपद रिक्त झाल्याने या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. पण या दोन्ही पदांसाठी सैकिया आणि भाटीया यांचेच अर्ज मंडळाकडे दाखल झाले होते. त्यामुळे या दोघांची या पदांसाठी बिनविरोध निवड करण्यात येणार आहे. बीसीसीआयचे मावळते सचिव जय शहा यांनी 1 डिसेंबरपासून आयसीसीच्या चेअरमनपदाची सुत्रे हाती घेतली आहेत. बीसीसीआयचे खजिनदारपद यापूर्वी आशिष शेलार यांच्याकडे होते. पण महाराष्ट्र शासनाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती केल्याने त्यांच्या जागी आता खजिनदारपदाचा कार्यभार भाटीया यांच्याकडे सोपविला जाईल.









