योग्य पद्धतीने शेती केल्यास तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घेतल्यास शेतीतूनही लाखो रुपयांची कमाई होऊ शकते, हे भोपाळच्या उच्चशिक्षित हर्षित बोधा यांनी सिद्ध केले आहे. काही वर्षांपूर्वी ते ब्रिटनमध्ये नोकरी करीत होते. ब्रिटनमध्येच त्यांनी बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. काही वर्षे नोकरी करून त्यांनी बऱयापैकी पैसा गाठीला लावला. ब्रिटनमध्ये असतानाही त्यांना मातृभूमीची ओढ होतीच. त्यामुळे 2018 मध्ये भोपाळमध्ये परत येऊन त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. घरच्या लोकांसाठी हा निर्णय आश्चर्यकारक होता. ब्रिटनमध्ये चांगला जॉब सोडून शेती करण्याचे मुलाने हे काय डोक्मयात घेतले? असे त्यांच्या आईवडिलांना वाटले.
तथापि, त्यांनी विरोध केला नाही. हर्षित यांनी 2019 मध्ये ऍव्होकॅडो फार्मिंगची सुरुवात केली. त्यांनी शेतीसाठी इस्रायली ऍव्होकॅडोची निवड केली. 2020 पासून कोरोना संकटाने डोके वर काढल्याने त्यांच्या प्रगतीच्या मार्गात थोडी बाधा उपन्न झाली. तथापि, त्याचा विचार न करता त्यांनी मशागत सुरूच ठेवली.
ब्रिटनमध्ये असतानाच त्यांनी इस्रायलचा अभ्यास दौरा केला होता. इस्रायलमधील नापीक जमिनीमध्येही ऍव्होकॅडोचा स्वर्ग फुलल्याचे बघून त्यांच्या मनात भारतात हा प्रयोग करण्याची महत्त्वाकांक्षा उत्पन्न झाली. गेल्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी ऍव्होकॅडोची नर्सरी सुरू केली. हे रोप तयार होण्यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागतो. सध्या त्यांचा व्यवसाय बाल्यावस्थेत आहे. तथापि, त्यांच्या या नव्या प्रयोगाचे कौतुक मात्र सर्वत्र होत आहे. नोकरी सोडून शेती करण्याचा त्यांचा निर्णय धाडसाचा मानला गेला आहे. पण हर्षित यांना आपल्या यशाबद्दल शाश्वती वाटते. शेती हा मानवाचा मूळ व्यवसाय असून आजवर मानवजातीचे संवर्धन याच क्यवसायाने केले आहे. त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने हा व्यवसाय केल्यास आणि वाजवी अपेक्षा ठेवल्यास हा व्यवसाय अपयशी होत नाही, असा त्यांचा विश्वास आहे. आतापर्यंत त्यांनी एक एकरमध्ये दोनशे रोपे तयार केली असून आणखी तीन एकर जमिनीत ते हा व्यवसाय विस्तारणार आहेत. आतापर्यंत त्यांनी लावलेल्या सर्व रोपांना ग्राहक मिळालेला आहे.









