हजारो उत्तर भारतीय नागरिकांचा सहभाग, मुख्यमंत्री व आमदारांचीही उपस्थिती
प्रतिनिधी /वास्को
बायणा समुद्रकिनारी हजारो उत्तर भारतीय नागरिकांनी रविवारी संध्याकाळी छटपुजा उत्सव साजरा केला. या किनाऱयावर दरवर्षी साजरा केल्या जाणाऱया या उत्सवाला यंदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही उपस्थिती लावली. आमदार दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर, मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक यांचीही विशेष उपस्थिती होती.
वास्कोतील बायणा समुद्र किनाऱयावर मागच्या काही वर्षांपासून आमदार दाजी साळकर यांच्या सहकार्याने मोठय़ा उत्साहात छट पुजा साजरी केली जाते. उत्तर भारतीय कुटुंबीय हजारोंच्या संख्येने या उत्सवात सहभागी होत असतात. यंदा या पुजेच्या उत्साहात अधिकच भर पडली होती. नागरीकांनी अस्ताला जाणाऱया सुर्य देवाची पारंपरीक पध्दतीने उपासना केली. संध्याकाळी उशिरापर्यंत बायणा किनारा या उत्सवाने फुलून गेला होता. गोमंकीय लोकही या उत्सवात सहभागी झाले होते. आज सोमवारी सकाळी सुर्योदय उपासना होऊन छट पुजा उत्सवाची सांगता होणार आहे.
या उत्सवानिमित्त बायणा किनारी खास समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच सन्माननिय अतिथी म्हणून वास्कोचे आमदार दाजी साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर उपस्थित होते. व्यासपिठावर मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक, गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक, वास्को रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय सातार्डेकर, मुरगावचे उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, नगरसेवक गिरीष बोरकर, शमी साळकर, श्रध्दा आमेणकर, उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष राकेश अगरवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.









