गावातील एसटी बसेस वेळेत सोडण्याची मागणी
ओटवणे प्रतिनिधी
सातुळीसह बावळाट गावात जाणारी सकाळी ९:१५ च्या एसटी बससह इतर बस अनेक महिन्यांपासून नियमित नसल्याने या दोन्ही गावातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याबाबत एसटी प्रशासनाचे लक्ष वेधुनही दुर्लक्ष करण्यात आल्याने बावळाट गावातील संतप्त प्रवाशांनी एसटी आगाराला धडक देत याचा जाब एसटी स्थानक प्रमुख श्री गावित यांना विचारला.
या चर्चेदरम्यान नविन आलेले स्थानक प्रमुख श्री गावित यांनीही इतर स्थानक प्रमुखांप्रमाणे नेहमीचीच थातुर मातुर उत्तरे दिल्यामुळे उपस्थित संतप्त ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. त्यानंतर स्थानक प्रमुख श्री गावित यांनी या दोन्ही गावातील बस सेवा सुरळीत व नियमित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.
सातुळी आणि बावळाट या दोन्ही गावासाठी सावंतवाडी बसस्थानकातून पहाटे साडेपाच, सकाळी सव्वा नऊ आणि दुपारी सव्वा बारा अशा तीन बस सुरू आहेत. परंतु या बसेस नियमित वेळेत सुटत नसल्यामुळे या दोन्ही गावातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याबाबत सावंतवाडी एस टी प्रशासनाचे यांचे अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे बावळाट ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळीच सावंतवाडी बस स्थानक गाठून स्थानक प्रमुख श्री गावित यांना धारेवर धरले.
यावेळी बावळाट माजी सरपंच उत्तम परब, बाबल परब, सावंतवाडी तालुका दक्षता समिती सदस्य सुरेश कदम, विशेष कार्यकारी अधिकारी महेंद्र परब, उत्तम ठाकुर, अनिल सावंत, विनायक परब, सुशील कदम, राजन सावंत, खेमराज सावंत, एकनाथ परब, बाबल परब, टीळोजी परब, प्रवीण परब, गजानन गावकर, सुधीर गावकर, ज्ञानेश्वर परब, दिलीप सावंत आदी बावळाट गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.