कसबा बावडा / सचिन बरगे :
घरात साप आलाय ? कॉन्टॅक्ट टू ‘बीआरएफ’ ! पूरपरिस्थितीत मदत हवी असेल तर ‘बीआरएफ’शी संपर्क करा, हॉस्पिटलमध्ये रुग्णाला रक्ताची गरज आहे ? ‘बीआरएफ’ला कळवा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत कसबा बावड्यातील ‘बीआरएफ’ म्हणजे बावडा रेस्क्यू फोर्स सदैव तयार असते.
समाजाचे आपण काहीतरी देणे लागत आहोत, या उदात्त हेतूने कसबा बावड्यातील काही तरुणांनी एकत्रित येऊन 2020 ला बावडा रेस्क्यू फोर्स ची स्थापना केली. या फोर्सद्वारे समन्वयक मानसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक कामे केली जातात. पावसाळ्यात पुरात अडकलेल्यांची सुटका, त्यांना सुरक्षितस्थळी आणण्याचे काम या टीमकडून करण्यात येते. टीममध्ये पाच ते सहा युवक पट्टीचे पोहणारे आहेत. बावडा रेस्क्यू फोर्सचे युवक पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. पोहण्यासाठी आलेल्या लहान मुलांना पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे वाहून गेलेल्या दोन मुलांचे प्राणही या टीमने वाचवले आहेत.
कोरोना काळात मृत्यू पावलेल्या नागरिकांना ज्यावेळी त्यांच्याच नातेवाईकांनी नाकारले. त्यावेळी 25 ते 30 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम या टीम मधील निशिकांत कांबळे, अरविंद कांबळे, नंदकुमार पाटील, तौफिक शेख, नितीन माने, चेतन कांबळे, शैलेश लोखंडे, शशिकांत जाधव, योगेश रकटे आदींनी केले. बीआरएफटीम मध्ये अशांत मोरे, अभय निकम, चेतन बिरंजे, सौरभ कांबळे, निलेश पिसाळ, सुरज पाटील, टोनी घाडगे, शुभम कांबळे, सतीश गायकवाड, प्रदीप उलपे, सुनील जाधव, विनायक आळवेकर आदींसह एकूण 15 सर्पमित्रांचा समावेश आहे. या सर्पमित्रांकडून कुणाच्या घरी अथवा कार्यालयात साप आला असता एका कॉलवर काही क्षणात घटनास्थळी दाखल होऊन त्या सापाला पकडून वनविभाग किंवा नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडले जाते. तसेच त्यांच्याकडून सापांविषयी समज गैरसमज दूर केले जातात.
रस्त्यामध्ये एखादा अपघात घडल्यास त्या अपघातग्रस्ताची चौकशी करून त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्याचे काम बीआरएफ टीम कडून केले जाते. असाच एक प्रसंग म्हणजे जोतिबा डोंगर येथे देवदर्शन करून रात्री आठ वाजता घरी परत येणाऱ्या कळंब्यातील जाधव कुटुंबीयांच्या दुचाकीलह काळोखात अज्ञात चारचाकीने धडक दिली. जखमी अवस्थेत झुडपात पडलेल्या कुटुंबाला बीआरएफचे सदस्य निखिल कसबेकर याने तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करून वेळीच उपचार झाल्याने जाधव कुटुंबीयांचे प्राण वाचले. इतकेच नव्हे तर एखाद्याच्या घरी कोणाचे निधन झाल्यास त्या व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी सर्वतोपरी मदत केली जाते. बीआरएफ टीम मध्ये सध्या 50 सदस्य आहेत.
वरच्या मजल्यावर अडकलेल्या माकडाची सुटका, जखमी कबूतर, पोपट, रानमांजर अशा पशु पक्षांना जीवदान देण्याचे काम या टिम कडून झाले आहे. सर्प पकडणे, पुरात अडकलेल्यांची सुटका, उंच इमारतीवर अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी स्टिक, बॅग, शुज, लाईफ जॅकेट, यांत्रिक बोट, दोरखंडाची आवश्यकता असते. आमदार सतेज पाटील व माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून बीआरएफ टीमला यापैकी काही साहित्य मिळाले असून टीममधील वाढती संख्या पाहता आणखी साहित्याची गरज असल्याचे बावडा रेस्क्यू फोर्सचे समन्वयक मानसिंग जाधव यांनी सांगितले.
- मुलांसाठी मोफत प्रशिक्षण
बीआरएफ चा एक भाग असलेले राजाराम बंधारा ग्रुप चे सदस्य जितू केंबळे व अन्य सदस्य हे शाळांना सुट्ट्या पडल्यानंतर मे महिन्यात मुलांना पोहण्यास शिकवतात. खोल पाण्यात आपला बचाव कशा पद्धतीने करायचा हे शिकवले जाते. हे सर्व विना मोबदला शिकवले जाते.
- दरवर्षी बंधाऱ्याची स्वच्छता
पूर परिस्थितीत येथील राजाराम बंधारा वीस ते पंचवीस दिवस पाण्याखाली जातो. यादरम्यान पंचगंगा नदीतून वाहून आलेली मोठी झाडे, कचरा, गाळ हा पाणी ओसरल्यानंतर बंधाऱ्यात अडकून बसतो. अशा वेळी राजाराम बंधारा ग्रुप आणि बीआरएफ टीम कडून दरवर्षी बंधाऱ्याची स्वच्छता केली जाते.








