नातेवाईक-मित्रमंडळीतून संताप
बेळगाव : शहरातील स्मशानभूमींच्या दुरुस्तीकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. शहापूर येथील स्मशानभूमीमध्ये पथदीप नसल्याने सोमवार दि. 22 रोजी मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. यामुळे कुटुंबीयांबरोबरच नातेवाईक आणि मित्रमंडळीतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकाराकडे महानगरपालिका लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मनुष्य जन्मल्यानंतर संपूर्ण आयुष्य विविध कठीण समस्यांना तोंड देत जगत असतो. मृत्यूनंतर तरी त्याची या समस्यांतून सुटका होईल, असे त्याला वाटते. मात्र मृत्यूनंतरही त्याच्या समस्या सुटणे अवघड झाले आहे.
बेळगावमधील अनेक स्मशानभूमींमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. असे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. अनगोळ येथील स्मशानभूमीमध्येही पथदीप नाहीत. त्यामुळे त्याठिकाणीही अनेक मृतदेहांवर मोबाईलच्या साहाय्यानेच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. शहापूर येथील स्मशानभूमीमध्ये शंकरराव बांदिवडेकर यांच्यावर सोमवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात येत होते. मात्र त्याठिकाणी पूर्ण अंधार होता. त्यामुळे मोबाईलच्या बॅटरीचा आधार घेत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे. महानगरपालिकेने तातडीने स्मशानभूमीतील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.









