सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह
कसबा बीड/प्रतिनिधी (विश्वनाथ मोरे)
महे ता. करवीर येथे आज सांडपाण्याच्या प्रश्नावर महेशकुमार कांबळे या युवकाने सांडपाण्याने अंघोळ करून अनोखे आत्मक्लेश आंदोलन केले. घटनास्थळावरून महे गावातील मेन रोड येथे आंबेडकर चौक येथील गटारीत सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरूम टाकल्यामुळे सांडपाण्याचे निर्गतीकरण थांबले. यामुळे या गटारीत पाणी साठल्याने सांडपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे साचलेल्या सांड पाण्यामध्ये अळ्या झाल्यामुळे आसपासच्या घरातील लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. यावर कोणतीही कारवाई न झाल्याने महेशकुमार कांबळे यांनी आत्मक्लेष आंदोलन करुन यावर मार्ग निघावा म्हणून सांडपाण्याने अंघोळ करून प्रशासनास जाग आणण्याचे कार्य केले. यावेळी दगड म्हणजेच प्रशासन असे समजून त्याचे पूजन करून त्यास हळदीकुंकू वाहून सांडपाण्याची अंघोळ महेश कुमार कांबळे यांनी केली.
पण सद्यस्थितीचा विचार करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने मेन रस्त्यावरील सांडपाण्याचे 40 ते 50 वर्षापासूनची असणारी व्यवस्था निर्गतीकरणाची व्यवस्था आहे तशीच ठेवणे गरजेचे होते. पण स्थानिक तक्रार व सार्वजनिक बांधकाम विभाग यामध्ये ताळमेळ नसल्यामुळे तसेच प्रत्येकाची मर्जी सांभाळण्याचा प्रकारामुळे सांडपाणी विषय गंभीर बनला आहे. सदर सांडपाणी प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरूम टाकून मुजवल्यामुळे पाणी तुंबून रस्त्यावरून पाणी वाहू लागले आहे.
महेश कुमार यांनी केलेल्या या आंदोलनाची चर्चा सोशल मीडियावर झाल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष दिले. या सर्व प्रकरणास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्यामुळे पाणी प्रश्न निकालात काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क करून योग्य तो पर्याय काढू असे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक तक्रारदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यामध्ये ताळमेळ नसल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाल्याची कुजबुज होती. ज्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले, त्या ठिकाणच्या नागरिकांच्या मध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. श्रेयवादासाठी एकाने तक्रार करायची व दुसऱ्याने त्यावरती आक्षेप घ्यायचा अशी कुजबूज गावामध्ये चालू होती. यामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दुर्लक्षित होत आहे. याकडे स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामस्थ यांनी ही बाब गंभीरपणे घेणे गरजेचे आहे. पण महेश कुमार यांनी केलेल्या आंदोलनामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उचलून घेतला, ही कौतुकास्पद बाब आहे. यावेळी महेश कुमार कांबळे, अँड किरण नवाळे- पाटील, तेजस कांबळे, दयानंद कांबळे, विठ्ठल कांबळे, पांडुरंग कांबळे, निवास कांबळे, कल्पना कांबळे, ममता खांडेकर, मालुबाई कांबळे, वंदना कांबळे व आदी उपस्थित होते.