पदर अडकला अन..बेल्टमध्ये ओढल्या गेल्या
वार्ताहर/उचगाव
भात मळणी यंत्रामध्ये सापडून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बसुर्ते येथे रविवारी सायंकाळी घडली. या घटनेने शेतकरी वर्गात आणि या परिसरात भीतीचे वातावरण आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेची नोंद काकती पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा करण्यात आल्याचे समजते. बसुर्ते येथील शांता पुंडलिक बेनके (वय 68) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
यंत्रात पदर अडकला अन…
शांता यांचा भात मळणी यंत्रामध्ये पदर अडकला त्यानंतर बेल्टमध्येच त्या पूर्ण ओढल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची अधिक माहिती अशी, अलीकडे अनेक शेतकरी शेतामध्ये भात मळणी यंत्राचा उपयोग करून झटपट मळणी करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. याचप्रमाणे बसुर्ते या गावांमध्येसुद्धा यंत्राद्वारे भाताची मळणी सुरू असताना शांता या मळणी यंत्राशेजारी काम करत असताना अचानक त्यांचा पदर या मशिनीत अडकला गेला. आणि मशीनच्या वेगाने त्या मशीनमध्ये खेचल्या गेल्याने त्यांचा मशिनमध्ये अडकून गळफास लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तातडीने त्यांना बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी नेण्यात येत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे.









