हर हर महादेवाच्या गजरात इंगळया कार्यक्रम : सायंकाळी उशिरापर्यंत आंबिल गाडय़ीं मिरवणूक

वार्ताहर /किणये
बस्तवाड (हलगा) गावातील जागृत कलमेश्वर देवस्थानची यात्रा मोठय़ा उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. गुरुवारी सायंकाळी मंदिर परिसरात इंगळय़ांचा कार्यक्रम झाला. यावेळी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. हर हर महादेव…चा गजर करीत भाविक इंगळ्यातून धावताना दिसत होते. बस्तवाड गावातील कलमेश्वर यात्रेला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बुधवारपासून सुरुवात झाली. बुधवारी सकाळी कलमेश्वर मंदिरात पूजाअर्चा करण्यात आली. सायंकाळी गावात आंबील गाडय़ांची मिरवणूक झाली. या मिरवणुकीसाठी शेतकऱयांनी आपल्या बैलजोडय़ा आणल्या होत्या. बैलांना सजविण्यात आले होते. तसेच बैलगाडय़ांनाही आकर्षक अशी सजावट केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत आंबील गाडय़ांची मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात झाली. य् ाात्रेनिमित्त मंदिराला फुले व विद्युत रोषणाईची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. कलमेश्वर देवस्थान जागृत असल्यामुळे या भागातील विविध गावातील भाविकांनी यात्रेनिमित्त दर्शनाचा लाभ घेतला. गुरुवारी यात्रेच्या दुसऱया दिवशी सकाळी सात वाजल्यानंतर इंगळय़ासाठी लाकूड आणण्यात आले. त्यानंतर पुन्हा सजवलेल्या गाडय़ांमधून इंगळयासाठी लागणाऱया लाकडांची व गाडय़ांची मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत ढोलताशा-डिजे
य् ाा मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह ढोलताशा व डीजेचा गजर झाला. या मिरवणुकीत गुलालाची उधळण करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण बस्तवाड गाव जणू गुलाबी रंगात नाहून गेले होते. डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता. कामानिमित्त बाहेरगावी गेलेला कामगार वर्गही यात्रेनिमित्त आपल्या गावी परत आला होता. गुरुवारी सायंकाळी सातच्या दरम्यान कलमेश्वर मंदिरासमोर भव्य इंगळयांचा कार्यक्रम झाला. कलमेश्वर देवस्थान हे नवसाला पावणारे आहे. ज्या भक्तांना इंगळय़ांमधून जायचे होते. त्या सर्वांनी गुरुवारी दिवसभर उपवास केला होता. इंगळय़ांमधून पळून त्यांनी भक्तिभावाने आपला नवस पूर्ण केला. पुजारी, हक्कदार, पंच कमिटी आदींच्या हस्ते इंगळयांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वाद्यांचा गजर सुरू झाला. आणि हर हर महादेव असा जयघोष करीत भाविक इंगळ्यामधून पळू लागले. रात्री उशिरापर्यंत भाविक कलमेश्वराचे दर्शन घेताना दिसत होते. यात्रेनिमित्त विविध आध्यात्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात्रेला अलोट गर्दी झाली होती.









