तीन कोटी रुपये खर्चूनही नागरिकांना ये-जा करणे बनले अवघड
वार्ताहर/धामणे
बस्तवाड ते धामणे हा अडीच किलो मीटरचा रस्ता धामणे येथील एका शेतकऱ्याच्या तक्रारीमुळे या रस्त्यासाठी तीन कोटी खर्च करून देखील अर्धवट स्थितीत पडून आहे. हा रस्ता बस्तवाड (हालगा) येथील नवीन जैन बस्तीपासून सुरू होवून धामणे येथील कलमेश्वर नगरला मिळाला आहे. या अडीच किलो मीटरच्या रस्त्यासाठी माजी आमदार कै. संभाजी पाटील यांच्या प्रयत्नातून शासनाकडून मंजुरी मिळवून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आणि बस्तवाड येथील नवीन जैन मंदिराच्या शेजारून धामणे गावच्या हद्दीपर्यंत आणि धामणेमधील कलमेश्वरनगरपासून एक किलो मीटरपर्यंत हा रस्ता डांबरीकरण करून तयार झाला. परंतु धामणेमधील एका शेतकऱ्याने आपल्या शेताच्या हद्दीतून हा रस्ता करण्यासाठी तक्रार दिल्यामुळे मध्येच काम थांबले होते. परंतु आठ वर्षापासून दोनशे फूट लांबीच्या अंतराचा रस्ता या शेतकऱ्याच्या तक्रारीमुळे अडून राहिला आहे. या समस्येमुळे बस्तवाड व धामणे येथील नागरिकांना या रस्त्याने ये-जा करणेही समस्या बनून राहिली आहे. हा रस्ता बस्तवाड व धामणे गावाना ये-जा करण्यासाठी कमी अंतराचा व दोन्ही गावच्या शेतकऱ्यांच्या सोयीचा आहे. भागाच्या लोकप्रतिनिधीनी तक्रार केलेल्या शेतकऱ्याला जाब विचारून हा अर्धवट रस्ता पूर्ण करून बस्तवाड व धामणे गावच्या नागरिकांची समस्या दूर करावी, अशी मागणी बस्तवाड आणि धामणे गावच्या नागरिकांतून आता जोर धरू लागली आहे.









