कोल्हापूर / संग्राम काटकर :
क्रीडानगरी कोल्हापूरची मान आनंदाने उंचावले अशी झेप कोल्हापुरातील 14 वर्षीय राष्ट्रीय महिला बास्केटबॉलपटू अनन्या व्हटकरने घेतली आहे. तिला ग्वाल्हेरमधील नामांकित आयटीएम विद्यापीठातील बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एनबीए) अॅकॅडमीसाठी निवडले आहे. अनन्यासह देशातील 11 महिला बास्केटबॉलपटूनाच अॅकॅडमी स्थान देण्यात आले आहे.
अॅकॅडमीच्या विशेष यादीत अनन्याला तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. आगामी काळात या अॅकॅडमीमध्ये निवासी पद्धतीने अनन्या ही बास्केटबॉलचे आधुनिक धडे घेणार आहे. चार-सहा महिने नव्हे तर तब्बल चार वर्ष अनन्या ही प्रशिक्षण घेत राहणार आहे. हे प्रशिक्षणही तिला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून मिळणार आहे. प्रशिक्षण घेत घेत अनन्याला ग्वाल्हेरमधील एनबीए अॅकॅडमीशी संलग्न असलेल्या आयटीएम ग्लोबल स्कूलमध्ये 12 वीपर्यंतचे शिक्षण घेता येणार आहे. त्यानंतर तिच्या इच्छेनुसार तिला आयटीएम विद्यापीठातही शिकता येणार आहे. तसेच या काळात तिला स्कूलच्या संघातून राष्ट्रीय पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या बास्केटबॉल स्पर्धेत खेळता येणार आहेत. आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेतही तिला एनबीएम अॅकॅडमीच्या संघातून खेळण्याची संधीही मिळवत राहणार आहेच.
इतकेच नव्हे तर अनन्याची राहाण्याचा, जेवणाचा आणि शिक्षणाचा संपूर्ण खर्च बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाकडून केला जाणार आहे. त्यामुळे आई-वडीलांवर तिच्या शिक्षणाचा आर्थिक खर्चाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. एनबीएम अॅकॅडमी व आयटीएम विद्यापीठाच्या वसतीगृहात तिच्या निवासीची सोय करण्यात येणार आहेत. तसेच अॅकॅडमीत सकाळी अडीच तास व सायंकाळी प्रकाशझोत असलेल्या मैदानात तिच्याकडून तीन तास सराव करवून घेण्यात येणार आहे. जमेची बाजू म्हणजे एनबीए अॅकॅडमीत सराव करताना तिला महाराष्ट्रातील कोणत्याही बास्केटबॉल संघातून राज्य व राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत जिल्हा व महाराष्ट्र संघातून खेळण्याची मुभा असणार आहे. शिवाय देशात फेडरेशनच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत तिला एनबीए अॅकॅडमेच्या संघातून खेळण्याची संधीही असणार आहेच.
अनन्या ही एनबीए अॅकॅडमीपर्यंत पोहोचण्यासाठी डिसेंबर 2024 मध्ये हैद्राबादेत झालेली राष्ट्रीय 13 वर्षाखालील मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धा महत्वपूर्ण ठरली आहे. तिने या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून प्रतिनिधीत्व केले होते. स्पर्धेतील आठही सामने ती खेळली. बास्केटबॉल मैदानात पॉवर फॉरवर्ड (अॅटॅकिंग प्लेअर) म्हणून नाव कमवलेल्या अनन्याने स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात विऊद्ध संघांवर अचूक बास्केट टाकत महाराष्ट्र संघाला सामन्यात विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यातही अनन्याचा संघातील इतर मुलींइतकाचा वाटा राहिला. स्पर्धेतील अनन्याची ही कामगिरी एनबीए अॅकॅडमीच्या निवड समितीच्या नजरेस भरली. समितीनेही तिच्याकडील कौशल्याला दाद देत तिची ग्वाल्हेरमधील आयटीएम विद्यापीठातील एनबीए अॅकॅडमीसाठी निवड केली आहे. या निवडीमुळे तिला बास्केटबॉलचे आधुनिक धडे मिळणार तर आहेतच. शिवाय तिला भारतीय महिला संघात स्थान मिळवण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. या संधीचं सोनं करण्याची जिद्द मनात ठेवून ती येत्या 1 ऑगस्टनंतर अॅकॅडमीत प्रत्यक्ष बास्केटबॉलचे धडे घेणार आहे.
- राष्ट्रीय स्पर्धेतून अनन्याची अॅकॅडमीसाठी निवड
जरनगरातील रहिवाशी असलेली अनन्या ही येत्या 20 सप्टेंबरला 15 वर्षात पर्दापण करत आहे. तिची उंची 5 फुट 9 इंच आहे. अनन्याने मुंबईतील इंडियन नेव्ही स्कूलमधून बास्केटबॉल खेळायला सुऊवात केली. अनन्याही सध्या छत्रपती शाहू विद्यालयात (सीबीएसई) शिकत आहे. मागील काही वर्षांपूर्वी अनन्याचे वडील अमित व्हटकर हेही इंडियन नेव्हीच्या बास्केटबॉल संघातून खेळत होते. भारतीय संघातूनही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली आहे. आता वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अनन्यानेही एनबीए अॅकॅडमीच्या माध्यमातून भारतीय महिला संघात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले आहे.
-केदार सुतार (प्रशिक्षक : डू ईट बास्केटबॉल अॅकॅडमी)
- मला वेळोवेळी सर्वांचे मार्गदर्शन
राज्य पातळीवर झालेल्या शालेय व फेडरेशनच्या 7 राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत शाळा व कोल्हापूर जिल्हा संघातून मी प्रतिनिधीत्व केले आहे. त्यासाठी प्रशिक्षक केदार सुतार यांच्याकडून गेली चार वर्षे मिळालेले प्रशिक्षण माझ्यासाठी महत्वाचे ठरले आहे. शिवाय खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष व आमदार सतेज पाटील, सचिव डॉ. शरद बनसोडे यांचेही मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत राहिले. त्यामुळेच मी बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एनबीए) अॅकॅडमीत आधुनिक प्रशिक्षण घेण्यापर्यंत मजल माऊ शकले.
-अनन्या व्हटकर (राष्ट्रीय बास्केटबॉल)








