जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : प्रत्येक वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था
बेळगाव : सौंदत्ती येथील रेणुकादेवी डोंगरावर माघी पौर्णिमा यात्रेला सुरुवात झाली असून राज्य व विविध प्रांतांतून भाविक दर्शनासाठी येत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी प्राधिकरणामार्फत चोख व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी एकाच दिवशी लाखो भाविकांनी दर्शन घेतले आहे. मंदिरात प्रवेश आणि दर्शन घेतल्यानंतर बाहेर येण्यासाठी मार्ग सुलभ करून देण्यात आले आहेत. वाहतुकीवरही नियंत्रण ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. जिल्हाधिकारी रोशन यांनी बुधवार दि. 12 रोजी सौंदत्ती येथील रेणुकादेवी डोंगराला भेट देऊन तेथील मूलभूत सुविधांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांसमोर ते बोलत होते.
बैलगाडी, जिप, टेम्पो, ट्रॅक्टर, मोटारसायकल, कार, बस यासारख्या वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी 1500 पोलीस व गृहरक्षक नेमण्यात आले आहेत. पालकमंत्री, पर्यटन विकासमंत्री, पर्यटन विकास मंडळाचे अध्यक्ष, तसेच या भागाचे आमदार यांच्या सल्ला आणि सूचनांनुसार भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था करून देण्यात आली आहे. याशिवाय यंदा प्रथमच पर्यटन विकास मंडळ व प्राधिकरणतर्फे संयुक्तपणे भाविकांसाठी ताक वितरण करण्यात येत आहे. पुढीलवर्षी अन्नप्रसाद वितरणाची व्यवस्था करण्याची योजना आहे. तिरुपती देवस्थानाप्रमाणे येथे भाविकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान मंजूर झाले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
रेणुकादेवी डोंगरावर बैलगाड्यांनी येणारे भाविक मोठ्या प्रमाणात असतात. जनावरांना चाऱ्याची टंचाई भासू नये, याची दखल घेण्यात येत आहे. डोंगरावर वाहने पार्किंग व वाहनांच्या कोंडीची गंभीर समस्या दूर करण्यात आली आहे. बैलगाडी आणि वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. दर्जेदार व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरण आणि पर्यटन विकास मंडळाने योजना तयार केली आहे. जोगुळभावी, उगरगोळ व सौंदत्ती रस्त्यावरून डोंगराकडे येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगस्थळावर जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होत आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी रोशन यांनी दिली.
पंधरा टोईंग मशीनद्वारे वाहने स्थलांतर करण्याची व्यवस्था
विविध भागातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था, पथदीप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थानच्या परिसरातील रस्त्यांवर वाहने पार्किंग केल्यास वाहतुकीची कोंडी होऊ शकते. यावर पर्याय म्हणून पंधरा टोईंग मशीनद्वारे वाहने दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. देवस्थानजवळील रस्त्यावर कोणतीही वाहने उभी करण्यास निर्बंध करण्यात आला आहे. रस्त्याच्या बाजूने उभारलेली दुकाने हटविण्यात आली आहेत. त्यामुळे देवस्थान परिसरात मोकळे आणि स्वच्छ वातावरण निर्माण झाले असल्याचेही जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले.









