केवळ अर्धा फूट पाणी शिल्लक : डेडस्टॉकमधून पाणी उपसा करण्याची तयारी
वार्ताहर /तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाने तळ गाठला असून जलाशयाकडील पाणी वाहून नेणाऱ्या तिसऱ्या आणि सर्वात खालच्या व्हॉलवर केवळ अर्धा फूट पाणी शिल्लक राहिले आहे. प्रवाहाने पाणी हे कमी दाबाने व्हॉलमधून जात असल्याने पाणीपुरवठ्यात यापुढील कालावधीत व्यत्यय ठरणारे आहे. आठवड्यापूर्वी जलाशय व्यवस्थापनाने 50 हॉर्स पॉवरची एक मोटार पाण्यात सोडली आहे. यापुढील पाणीपुरवठा हा जलाशयाच्या डेडस्टॉकमधून उपसा करण्याची तयारी करण्यात आली आहे. बुधवार दि. 14 रोजी दुपारी आणखी एक 50 हॉर्स पॉवरची मोटार पाण्यात सोडण्यात आली आहे. बुधवारी सकाळी जलाशयाची पाणी पातळी 2448-85 फूट इतकी नोंद झाली आहे. मागील वर्षी (14-06-2022 रोजी) याच दिवशी पाणी पातळी 2454-60 फूट इतकी होती. मागील वर्षी पाणीसाठा मुबलक असल्याने पाणीटंचाईची झळ नव्हती. यावर्षी मात्र वळीव पावसाने निम्म्या जून महिन्यापर्यंत दडी मारल्याने पाणीसाठा खालावला आहे. बेळगाव शहर आणि उपनगरांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शहरवासियांना पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अर्धाफूट पाणीसाठा शिल्लक राहिला असला तरीही डेडस्टॉकमधील पाणी किमान 20 दिवस सुरळीतपणे पुरवठा करणारा साठा उपलब्ध आहे.
2019 सालाची पुर्नावृत्ती होणार
सन 2019 मध्ये पाणीपुरवठा मंडळाने जलाशय स्थापनेनंतर प्रथमच डेडस्टॉकमधील पाणीपुरवठा तीन वीज मोटारी वापरत केला होता. 29 जूनपर्यंत पावसाने दडी दिल्याने डेडस्टॉकमधील सहाफूट पाणी उपसा करत शहराला पाणी पुरवठा केला होता. आतापर्यंत पावसाने दडी मारल्याने यावेळीही डेडस्टॉकमधील पाणीपुरवठा करावा लागणार असल्याने जलाशय व्यवस्थापनाने तयारी चालविली आहे.









