मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे गौरवोद्गार
बेळगाव : घटप्रभा नदीकाठावर महात्मा बसवेश्वरांची 108 फुटी प्रतिमा उभारण्यासंबंधी लवकरच आदेश जारी करण्यात येणार असून हा परिसर जागतिक पर्यटनस्थळ बनविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. बुधवारी सकाळी गोवावेसजवळ बसवेश्वरांचा नूतन पुतळा उभारणी व विविध कामांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चालना देण्यात आली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली. यावेळी केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, राज्यसभा सदस्य वीरण्णा कडाडी, गदग येथील तोंटदार्य मठाचे डॉ. तोंटद सिद्धराम स्वामीजी, कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी, निडसोशी मठाचे श्री पंचमशिवलिंगेश्वर स्वामीजी, वीरशैव-लिंगायत महासभेच्या रत्नाक्का बेल्लद, अॅड. एम. बी. जिरली, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, महांतेश कवटगीमठ आदींसह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. बाराव्या शतकात बसवेश्वरांनी सन्मार्ग दाखविला आहे. जगातील पहिली संसद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुभव मंटपाची स्थापना त्यांनी केली. त्या काळात अनुभव मंटपात जी चर्चा व्हायची, ती आजच्या आधुनिक युगातही दखलपात्र आहे. सामाजिक असमानता, जातीभेद, लिंगभेद, अंधश्रद्धा आदी अनिष्ट प्रथांवर बसवेश्वरांनी घाव घातला. या प्रथांचा नायनाट होईपर्यंत बसवेश्वरांचे विचार आचरणात आणावे लागतील, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.









