काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेंगळूर
महात्मा बसवेश्वरांनी लोकशाहीचा मार्ग भारत आणि जगाला दाखवून दिला. ही बाब सत्य असून ती कधीही नष्ट होणार नाही. आपल्या देशात लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आली. या लोकशाही व्यवस्थेत बसवेश्वरांचे आदर्श दडलेले आहेत. संसद भवनासाठी बसवेश्वरांचे अनुभव मंटपच आदर्श आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केले.
बागलकोट जिल्ह्यातील कुडलसंगम येथे रविवारी बसव जयंतीनिमित्त उत्सव समितीने अनुभव मंटपमध्ये आयोजिलेल्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. बसवेश्वर सत्यासाठी लढले. समाजातील जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. अनेकांना सत्य ठाऊक आहे, पण ते समोर उघड करत नाहीत. आजच्या समाजात सत्य सांगणे कठीण आहे. आज लोकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. मात्र, बसवेश्वरांनी सत्य समाजासमोर मांडले. सत्याच्या मार्गावर चाला, सर्वांना सन्मानाची वागणूक द्या, असा संदेश जनतेला दिला होता, असेही ते म्हणाले.
कुडलसंगमला आपल्यानंतर आपल्याला खूप आनंद झाला आहे. बसवेश्वरांविषयी सिद्धराम स्वामीजींचे केलेले गुणगाण आजच्या समाजासाठी मौलिक विचार आहेत. बसवेश्वर यांनी समाजातील जातीव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांनी कुणालाही न घाबरता मनातील सत्य समाजासमोर मांडले. सत्याच्या मार्गावर चालणारे बसवेश्वर हे संपूर्ण देशासाठी आणि समाजासाठी आदर्श ठरले, असे गुणगानही राहुल गांधी यांनी केले.
कार्यक्रमप्रसंगी विविध मठांचे स्वामीजी, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील व इतर नेते उपस्थित होते. रविवारी सकाळी राहुल गांधी यांचे हुबळीहून हेलिकॉप्टरने कुडलसंगमला आगमन झाले. त्यांनी बसवेश्वरांच्या समाधीस्थळाला भेट देऊन दर्शन घेतले. बसवजयंती कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांनी दासोह भवनमध्ये प्रसादाचे सेवन केले.
विजापूरमध्ये रोड शो
कुडलसंगममध्ये दुपारी प्रसाद सेवन केल्यानंतर राहुल गांधी सिद्धरामय्यांसमवेत विजापूरला आले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. नंतर रोड शोमध्ये सहभागी झाले. तत्पुर्वी विजापूरमधील कनकदास सर्कलमध्ये उपस्थित समुदायाला त्यांनी संबोधित केले. राज्यात यावेळी काँग्रेस 150 जागांवर विजयी होणार असून यावेळी भाजपचे ‘ऑपरेशन कमळ’ची जादू चालणार नाही, असा दावाही त्यांनी केला.









