प. पू. गुरुसिद्ध महास्वामीजी यांचे प्रतिपादन : बँकेचा हीरकमहोत्सवी सोहळा थाटात साजरा : अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न
बेळगाव ; समाजाचे चिंतन करून साठ वर्षांपूर्वी समाजधुरिणांनी या बँकेची स्थापना केली. त्या संस्थापकांचे ऋण व्यक्त करीत असतानाच बसवाण्णांच्या नावाने सुरू झालेल्या या बँकेत जातीपातीच्या पलीकडचे समाजकार्य कौतुकास्पद आहे. केवळ 26000 ऊपयांचे भागभांडवल आणि 26 सभासद एवढ्यावर सुरू झालेल्या या बँकेचे काम फारच उत्तम आहे. या बँकेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि बँकेचा शतकमहोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्याचा योग यावा, असे विचार प. पू. गुरुसिद्ध महास्वामीजी यांनी व्यक्त केले. य् ाsथील श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँकेचा हीरकमहोत्सव सोमवारी शिवबसवनगर येथील केपीटीसीएलच्या सभागृहात झाला. यावेळी ते प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष बसवराज झोंड होते. व्यासपीठावर बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष बाळाप्पा कग्गणगी, उपाध्यक्षा दीपा कुडची उपस्थित होत्या.
बँकेच्या प्रगतीचा आढावा
स्वामीजी आणि संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आल्यानंतर बँकेचे संचालक रमेश कळसण्णावर यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्वामीजींचा सत्कार बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांच्या हस्ते करण्यात आला. बँकेचे प्रधान व्यवस्थापक एस. एस. वाली यांनी प्रास्ताविक केले. चेअरमन बसवराज झोंड यांनी स्वागत केले. यावेळी ते म्हणाले, बँकिंग क्षेत्रात डिजिटल, संगणकाचा वापर वाढला आहे. बँकेत सर्व अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
बँकेची उल्लेखनीय प्रगती
बँकेच्या दहा शाखा विविध ठिकाणी कार्यरत असून संचालक व कर्मचारीवर्ग यांच्या एकजुटीमुळे बँक दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. ग्राहक व सदस्यांना उत्तम सेवा देण्यासाठी बँकेचे संचालक आणि कर्मचारीवर्ग कटिबद्ध आहोत. समर्पित भावनेने आजवरच्या सर्व संस्थापक, संचालक व कर्मचारीवर्गाने कार्य केल्यामुळेच बँकेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे, अशी माहिती बँकेच्यावतीने देण्यात आली. त्यानंतर पुणे येथील द मॅजिक मॅन ऑफ मेलोडी मेकर्स यांचा संगीताचा बहारदार कार्यक्रम झाला. त्यांनी अनेक गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आभार बाळाप्पा कग्गणगी यांनी मानले.









