प्रतिनिधी/ बेळगाव
व्यापाऱ्यांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या रविवार पेठेतील श्री बसवेश्वर को-ऑप. अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक रविवार दि. 29 डिसेंबर रोजी होत आहे. 11 सामान्य वर्ग जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 15 उमेदवार उभे असून मागासवर्गीय ब गटात एका जागेसाठी तीन, महिला गटात दोन जागांसाठी चार आणि अनुसूचित जमाती एका जागेसाठी दोन उमेदवार उभे आहेत. ओबीसी अ गटातून रमेश एस. सिद्धण्णावर तर एसटी गटातून राजीव बाळकृष्ण काळेनट्टी हे अविरोध निवडून आले आहेत.
विद्यमान संचालक मंडळाने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी बरेच प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. त्यामुळे निवडणूक होणार आहे. बसवेश्वर बँकेचे सभासद 10329 असले तरीही त्यातील फक्त 4837 मतदारांना मतदानाचा अधिकार आहे. रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत इस्लामिया हायस्कूल, कॅम्प येथे मतदान होणार आहे.
62 वर्षांची परंपरा असलेल्या या बँकेच्या दहा शाखा आहेत. रविवारपेठेतील मुख्य शाखेसह बेळगाव व परिसरात सात शाखा असून हुबळी, मुधोळ व रामदुर्ग येथे प्रत्येकी एक शाखा आहे. विद्यमान पॅनेलमध्ये नऊ उमेदवार असून त्यातील अनेक जण अनेक वेळा संचालक म्हणून काम पाहत आहेत. बँकेची आम्ही उल्लेखनीय प्रगती केली असून याहीपुढे भागधारक आमच्या पॅनेलला निवडून देतील, असा विश्वास चेअरमन रमेश कळसण्णावर यांनी व्यक्त केला आहे.
या उमेदवारांमध्ये गिरीश शिवशंकर कत्तीशेट्टी, प्रकाश मल्लाप्पा बाळेकुंद्री, बसवराज विरुपाक्षप्पा झोंड, बसवराज वीरबसाप्पा उप्पीन, बाळाप्पा बसाप्पा कग्गणगी, रमेश महारुद्रप्पा कळसन्नावर, विजयकुमार चन्नबसाप्पा अंगडी, सचिन रामाप्पा शिवण्णावर आणि सतीश कलगौडा पाटील हे विद्यमान संचालक निवडणूक लढवित आहेत. मागासवर्गीय ब गटातून गिरीश वीरुपाक्षप्पा बागी, महिला गटातून दीपा महांतेश कुडची व सरला शिवानंद हेरेकर तर परिशिष्ट जाती गटातून चंद्रकांत हनुमंतप्पा कट्टीमनी हे विद्यमान संचालक निवडणूक लढवित आहेत. चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.









