रोटरी अन्नोत्सवचा उपक्रम : वंचित मुलांना कौशल्याधारित शिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याचा हेतू
बेळगाव : रोटरी अन्नोत्सव उपक्रमांतर्गत रविवारी ‘रोटे. बसवराज विभुती मेमोरियलतर्फे सबको विद्या’ या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या अंतर्गत वंचित मुलांना कौशल्याधारित शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविणे हा हेतू आहे. याप्रसंगी पात्र विद्यार्थ्यांना कविता बसवराज विभुती यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. व्यासपीठावर माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, शिरीष गोगटे, डॉ. प्रभाकर कोरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुहास चांडक, आंतरराष्ट्रीय संचालक सुब्रमण्यम, माजी प्रांतपाल आनंद सराफ, अन्नोत्सवचे चेअरमन शैलेश मांगले व अक्षय कुलकर्णी उपस्थित होते. रोटे. बसवराज विभुती यांनी आपल्या कार्यकाळात रोटरी केएलई डायलेसिस सेंटर सुरू केले. 1998 पासून ते रोटरीत सक्रिय होते.
2022-23 या काळात त्यांनी क्लबचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली. त्यांच्याच स्मृतीप्रित्यर्थ सबको विद्या हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दहावीनंतर आर्थिक दुर्बलतेमुळे ज्यांना शिक्षण सोडावे लागते, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा शैक्षणिक प्रवाहात सहभागी करून घेणे हा सबको विद्याचा उद्देश आहे. यासाठी दहावी किंवा बारावी परीक्षेत विद्यार्थ्याने किमान 70 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. रोटरीच्या सदस्यांतर्फे त्यांची मुलाखत घेतली जाईल. जेव्हा हे विद्यार्थी अर्थार्जन करू लागतील, तेव्हा त्यांनी ‘पे इट फॉरवर्ड’नुसार दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी मदत करणे आवश्यक आहे. या उपक्रमात शिरीष गोगटे यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. अन्नोत्सवमध्ये संकलित झालेला निधीसुद्धा या उपक्रमासाठी राबविण्यात येणार आहे.
अन्नोत्सवाची आज सांगता
शहरात लक्षवेधी गर्दी करणाऱ्या रोटरी अन्नोत्सवाची आज सांगता होत आहे. यानिमित्त दि. 14 रोजी बॉलिवूड मिक्सोलॉजी हा कार्यक्रम होणार आहे.









