बिरेश्वर संस्था, जोल्ले उद्योग समूह करणार आर्थिक मदत
संकेश्वर : नुकताच हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष निखिल कत्ती यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीत अध्यक्षपदी बसवराज कलट्टी व उपाध्यक्षपदी अशोक पट्टणशट्टी यांची उर्वरित 27 महिन्यांच्या कालावधीसाठी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केली. यावेळी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा हिरण्यकेशी साखर कारखाना प्रशासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी दि. अप्पनगौडा पाटील, बसगौडा पाटील व विश्वनाथ कत्ती यांनी हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे कारखाना नावारुपास आला. हा कारखाना लीजवर न देता संचालक मंडळाच्या बळावरच चालविण्यासाठी माझ्याकडे आलेल्या संचालकांनी शेतकरी, कर्मचारी व ऊस उत्पादकांचे हित लक्षात घेतले. बिरेश्वर संस्था, जोल्ले उद्योग समुहाकडून आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला.
आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आर्थिक मदत करण्याचा निर्धार करून हिरण्यकेशी लीजवर न देता स्वबळावरच चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साखर कारखान्याची स्थिती उत्तम आहे. इथेनॉल, को-जनरेशन, स्पिरीट आदी उत्पादनातून आगामी काळात कारखान्यावर असणाऱ्या कर्जाचे व्याज सुरळीतपणे देण्यासह उसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची बिले वेळेवर अदा करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देणे, खर्चाचा शिस्तबद्ध ताळमेळ घालणे, कारखाना योग्यरित्या चालवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात इथेनॉल प्रकल्प सुरु करुन सभासदांना 50 किलो साखर वितरण केले जाणार आहे. ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनाही टनामागे साखर दिली जाणार आहे.
10 हजारपर्यंतचे व्याज व खत वितरण सवलतीच्या दरात उस उत्पादकांना देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हिताला अधिक महत्त्व दिले जाणार आहे, असे माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले. नूतन उपाध्यक्ष अशोक पट्टणशट्टी म्हणाले, हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचा साखर उद्योगात लौकीक आहे. 10 हजार मे. टन ऊस गाळपाची क्षमता आहे. अशी समृद्धता असताना केवळ कर्जामुळे कारखाना लिजवर देणे आम्हाला पटले नाही. कारखान्याला आगामी काळात गतवैभव प्राप्त करुन देण्याचे कार्य जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास ज्येष्ठ संचालक शिवनाईक नाईक, आप्पासाहेब शिरकोळी, बाबासाहेब अरबोळे, प्रभुदेव पाटील, बसवराज मरडी, सुरेंद्र दोडलिंगन्नावर व कार्यकारी संचालक साताप्पा करकीनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.









