1 एप्रिलपूर्वी पदमुक्त करण्याची उपसभापतींकडे पत्राद्वारे विनंती
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. विधानपरिषदेचे उपसभापती प्राणेश यांना राजीनामा पत्र पाठवले असून 1 एप्रिलपूर्वी आपला राजीनामा स्वीकारून सभापतीपदावरून मुक्त करण्याची विनंती केली आहे. कर्नाटक विधानपरिषदेतील सदस्यांची वागणूक योग्य नाही. त्यामुळे मी विधानपरिषद सभापतीपदाचा राजीनामा देणार असल्याचे बसवराज होरट्टी यांनी रविवारी सकाळी हुबळी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यानंतर त्यांनी उपसभापतींना राजीनामा पत्र पाठवले आहे.
बसवराज होरट्टी यांनी रविवारी सकाळी विधानपरिषदेच्या सभापतीपदाचा राजीनामा देणार असल्याचे पत्रकारांना सांगितले होते. वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत आहे. 31 मार्चपूर्वी आपला राजीनामा मंजूर करावा, अशी विनंती होरट्टी यांनी पत्रात केली आहे.
हुबळीत पत्रकारांशी बोलताना होरट्टी म्हणाले, आजच्या राजकारण्यांना सभागृहात हाताळता येत नाही. त्यामुळे मी विधानपरिषदेच्या सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. आजच्या दिवसांत सभागृह सांभाळणे कठीण आहे. त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सभागृहातील घडामोडींना मी कंटाळलो आहे. सभापतींचे कोण ऐकत नाहीत. सभागृहातच आंदोलन केले जाते. विधानपरिषदेत पत्ते खेळायला आणतात. मी सभागृह चालवण्यास योग्य नाही. शुक्रवारी मी 17 मिनिटे शांत बसलो होतो. त्यामुळे मी सभागृहात न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी 45 वर्षांपासून राजकारणात आहे. सभागृहात कोणीही मान देत नसल्याबद्दल बसवराज होरट्टी यांनी खंत व्यक्त केली.









