हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा : कर्नाटकासह महाराष्ट्रातही होते भक्त
प्रतिनिधी / चिकोडी
चिंचणी व मजलट्टी येथील कलमेश्वर अल्लमप्रभू मठाचे पिठाधीश सद्गुरु बसवप्रभू महाराज (वय 76) यांचे रविवारी हृदयघाताने निधन झाले. शांत स्वभाव व सहृदयी अशी त्यांची ख्याती होती. गेल्या 40 वर्षांपासून ते चिंचणी व मजलट्टी येथील कलमेश्वर अल्लमप्रभू सांप्र्रदायांमध्ये आध्यात्मिक, परमार्थ, धार्मिक परंपरा कार्यक्रमांमध्ये तसेच सीमावर्ती कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये कार्य करीत होते. त्यांच्यावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत मजलट्टी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कर्नाटकासोबत महाराष्ट्रातील इचलकरंजी परिसरात त्यांचा भक्त परिवार मोठ्या प्रमाणात आहे. दरमहा अमावस्येला सत्संग कार्यक्रम, चिंतन गोष्टी, शास्त्र पुराण कथन करण्यासोबत हजारो भाविकांच्या जीवनाचा मुक्तीचा पथदीप ते दाखवित होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या भाविकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पार्थिवाची चिंचणी व मजलट्टी येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा काढण्यात आली.
चिकोडी येथील चरमुर्ती मठाचे संपादनास्वामी, सदलगा येथील गीताश्रमाचे डॉ. श्रद्धानंद स्वामी, निपाणी समाधी मठाचे प्राणलिंग स्वामी, अभिनव कलमेश महाराज, आडीचे सिद्धेश्वर महास्वामी, बिदरळ्ळीचे सिद्धलिंग स्वामी, यमकनमर्डीचे बसव स्वामी, कमतेनट्टीचे हनुमंत शास्त्राr, आमदार दुर्योधन ऐहोळे, माजी जिल्हा पंचायत सदस्य महेश भाते, मजलट्टीचे रुद्रप्पा संगाप्पगोळ यांच्यासह हजारो भाविक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. रात्री उशिरा त्यांच्यावर मजलट्टी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, दोन मुले असा परिवार आहे.









