पूर्व भागात पावसाचा जोर वाढला : भातपिके पाण्याखाली
वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्वभागांमध्ये पावसाची सुरूच असून बसवण कुडची परिसरातून गेलेल्या बळळारी नाल्याला पहिल्यांदाच पूर आला आहे. त्यामुळे नाला परिसरातील भातपिके पाण्याखाली गेली आहेत. पूर्वभागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मारिहाळ, सुळेभावी आदी गावांमध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी बसवण कुडची शिवारातून गेलेल्या बळळारी नाला, सांबरा व बाळेकुंद्री खुर्द येथील नाल्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. व बळळारी नाल्याला पहिल्यांदाच जून महिन्यामध्ये पूर आला आहे. त्यामुळे नाला परिसरातील शेती पाण्याखाली गेली असून कोवळी भातपिके कुजण्याचा धोका शेतकऱ्यांतून वर्तविण्यात येत आहे. पूर्वभागामध्ये धूळवाफ पेरणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. निम्म्याहून जास्त शिवारातील भातपिके उगवली असून अजून बरीच भातपिके उगवण्याच्या प्रक्रियेत आहेत. असाच पाऊस राहिल्यास यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.









