बसवेश्वर महाराजांचा जयघोष : लिंगायत बांधव-विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग : मिरवणुकीत बसवेश्वरांच्या वचनांचे प्रबोधन
बेळगाव : बसव जयंती उत्सव समितीतर्फे रविवारी शहरात बसव जयंतीनिमित्त मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. कित्तूर राणी चन्नम्मा चौकामध्ये बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीवर पुष्पवर्षाव करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत मठाधीश, स्वामीजी, लोकप्रतिनिधी आणि लिंगायत समुदायाच्या विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फुलांनी सजविलेली पालखी, बसवेश्वर महाराजांची मूर्ती, धनगरी ढोल, बँजो पथकाचा निनाद आणि महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयघोषात निघालेली मिरवणूक लक्षवेधी ठरली. यावेळी पुष्प माळांनी सजविलेली बसवेश्वर महाराजांची प्रतिमा लक्ष वेधून घेत होती. संपूर्ण राज्यात सर्वपक्षीय समुदायातर्फे बसवेश्वर जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातही सर्वपक्षीय लिंगायत समुदायाचे नेते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी एकत्रित आले होते. या मिरवणुकीत विशेषत: बसवेश्वरांच्या वचनांचे प्रबोधन करण्यात आले. चन्नम्मा चौक येथून मिरवणुकीला प्रारंभ होऊन काकतीवेस, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोडमार्गे लिंगराज कॉलेज मैदानावर सांगता झाली. या मिरवणुकीत खासदार जगदीश शेट्टर, केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ, विधानपरिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी खासदार मंगला अंगडी, एम. बी. जिरली, मुरुगेंद्रगौडा पाटील आदी सहभागी झाले होते. यावेळी लिंगायत समाजाचे बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.









