आणखी एक जखमी : सौंदत्तीला जाताना अपघात
बेळगाव : भरधाव कारची मोटारसायकलला धडक बसून सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या बसरीकट्टी (ता. बेळगाव) येथील एका भाविकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. गुरुवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मबनूरजवळ ही घटना घडली आहे. भाऊराव कृष्णा चौगुले (वय 30) रा. संभाजी गल्ली, बसरीकट्टी असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. सुधीर बसवाणी हंजूर (वय 36) रा. बसरीकट्टी असे जखमीचे नाव आहे. त्याच्या पायांना दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
सौंदत्ती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक धर्माकर धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यात्रेनिमित्त भाऊराव यांचे कुटुंबीय सौंदत्ती डोंगरावर देवीच्या दर्शनासाठी गेले होते. आपल्या एका मित्रासमवेत भाऊरावही दुचाकीवरून डोंगरावर निघाला होता. त्यावेळी मबनूरजवळ भरधाव कारची मोटारसायकलला धडक बसून एका भाविकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. भाऊरावच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, चार बहिणी असा परिवार असून तो हिंदू संघटनांच्या कार्यातही सक्रिय होता. शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सौंदत्ती पोलीस पुढील तपास करीत आहेत.









