श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेची पूर्वतयारी जोरात
वार्ताहर /सांबरा
बसरीकट्टी येथे दि. 13 फेब्रुवारीपासून होणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेची पूर्वतयारी करण्यासाठी श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीने कंबर कसली आहे. यात्रा काळामध्ये मुख्य रस्त्यावर ताण पडू नये यासाठी बसरीकट्टी ते मुतगा दरम्यान तात्पुरता संपर्क रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. बेळगाव शहर व परिसरातून बसरीकट्टीला येण्यासाठी एकमेव मार्ग आहे. त्यामुळे साहजिकच यात्रा काळामध्ये शिंदोळी क्रॉस ते बसरीकट्टी या रस्त्यावर मोठा ताण पडणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील ताण कमी व्हावा यासाठी महालक्ष्मी यात्रा कमिटीकडून बसरीकट्टी ते मुतगा दरम्यान शेतवडीतून तात्पुरत्या संपर्क रस्त्याची निर्मिती करण्यात येत आहे. यात्रा करून परतणाऱ्या भाविकांना या रस्त्याचा वापर करून बेळगाव गाठता येणार आहे. यात्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रा कमिटीने ही कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान होत आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचेही सहकार्य लाभले आहे. त्यामुळे त्यांचेही कौतुक करण्यात येत आहे. रस्ता कामाच्या शुभारंभप्रसंगी श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष विक्रम देसाईसह बसवानी कोंडसकोप, कुशाप्पा खन्नूकर, संजीव देसाई, सिद्राई नागरोळी, सुधीर देसाई, यल्लाप्पा चौगुले, सोमनाथ कुरंगी आदि उपस्थित होते.









