यात्रा कमिटी-ग्रामस्थांकडून जय्यत तयारी : तब्बल 17 वर्षांनंतर यात्रा : यात्रेसाठी परिवहनकडून जादा बसेसची सोय
वार्ताहर /सांबरा
बसरीकट्टी (ता. बेळगाव) येथे मंगळवार दि. 13 फेब्रुवारीपासून होणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी बसरीकट्टीवासीय सज्ज झाले आहेत. यात्रेनिमित्त यात्रा कमिटी व ग्रामस्थांकडून जय्यत तयारी करण्यात आली असून ठिकठिकाणी स्वागत कमान्या उभारण्यात आल्या आहेत. तर महालक्ष्मी देवीच्या गदगेच्या ठिकाणी आकर्षक मंडप उभारण्यात आला आहे. तब्बल 17 वर्षानंतर होणाऱ्या यात्रेसाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. मंगळवार दि. 13 रोजी यात्रेला सुरुवात होणार असून सर्व देवतांची पूजा-अर्चा व महालक्ष्मी देवीची पहिली पूजा करण्यात येणार आहे. यावेळी देवीला गोड नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. बुधवार दि. 14 रोजी पहाटे गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम होणार असून अक्षतारोपण, देवीचे दर्शन, हक्कदारांकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर देवी रथावर विराजमान झाल्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर सायंकाळी देवी गदगेवर विराजमान होणार आहे. यात्रेची पूर्वतयारी गेल्या काही महिन्यांपासून करण्यात ग्रामस्थ गुंतले होते. घरांची दुरुस्ती, रंगरंगोटी, नवीन बांधकाम यासह इतर कामे ग्रामस्थांनी करून घेतली आहेत. तर सध्या मूळचे बसरीकट्टीचे असलेले व सध्या परगावला असलेले भाविकदेखील गावांमध्ये दाखल झाले आहेत. शेतामध्ये मंडप उभारण्यात आले आहेत. ग्रामस्थांनीही घरावर व परसामध्ये भक्तांच्या सोयीसाठी भव्य मंडप उभारले आहेत. यात्रेनिमित्त गावांमध्ये पाळणे, मनोरंजनाचे प्रकार, विविध स्टॉल्स दाखल झाले आहेत. यात्रा उत्साहात साजरी करण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतीनेही गावातील स्वच्छता व इतर व्यवस्थेकडे लक्ष दिले आहे. यात्रेनिमित्त शिंदोळी ते बसरीकट्टी रस्त्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पै पाहुण्यांचेही गावामध्ये आगमन होऊ लागले असून मंगळवारनंतर भाविकांच्या गर्दीत वाढ होणार आहे. तसेच राज्य परिवहन मंडळाने जादा बसेसची सोय केली आहे. भाविकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.









