वृत्तसंस्था/ जयपूर
नेदरलँड्समध्ये रविवारी झालेल्या र्फोजा डच आंतरराष्ट्रीय सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या इशाराणी बारुआ तसेच महिला दुहेरीत के. अश्विनी भट व शिखा गौतम यांनी आपले वर्चस्व राखण्यात यश मिळविले. या स्पर्धेत महिलांच्या एकेरीत इशाराणी बारुआने आपल्याच देशाच्या देविका सिहागचा 19-21, 23-21, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव करत जेतेपद पटकाविले. हा अंतिम सामना 65 मिनिटे चालला होता. देविका सिहाग आणि बारुआ हे प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीमध्ये सराव करतात.
महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताची टॉप सिडेड जोडी अश्विनी भट आणि शिखा गौतम यांनी डेन्मार्कच्या निलसेन व वेरगे यांचा 21-18, 21-14 असा फडशा पाडत अजिंक्यपद पटकाविले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कर्नाटकाच्या अश्विनी भट आणि शिखा यांनी शेवटपर्यंत एकही गेम गमाविला नाही.









