पुणे / प्रतिनिधी :
बारसूचा मुद्दा हा राजकीय नाही. या मुद्दय़ावर आम्ही जनतेसोबत असून, लोकांची भूमिका हीच सेनेची भूमिका असल्याचे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.
पुण्यातील वेताळ टेकडी वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर वेताळ टेकडीला आदित्य ठाकरे यांनी शनिवारी भेट दिली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ठाकरे म्हणाले, विकास हा शाश्वत हवा. पर्यावरणासोबत विकास कसा होऊ शकतो, याचा विचार हवा. मागच्या काही महिन्यांमध्ये वेगवेगळय़ा प्रकल्पांवरून संघर्ष झडत आहे. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार, अनियमितता व पर्यावरणाला नख लावण्याचे प्रकार होत आहेत. वेताळ टेकडी, आरे किंवा बारसूसारखे प्रकल्प असतील. ते दडपशाहीच्या माध्यमातून रेटण्यात येत आहेत. वास्तविक लोकांवर लाठीकाठय़ा चालवून, अश्रधूर सोडून विकास होत नसतो. मात्र, सध्याचे घटनाबाहय़ सरकार याच गोष्टींचा आधार घेत असल्याचे पहायला मिळते. ही हुकूमशाहीच आहे.
खरे तर महाराष्ट्राला हवे असलेले वेदांता वा एअरबससारखे प्रकल्प गुजरात वा अन्यत्र हलविण्यात आले. जे प्रकल्प नको होते, ते मात्र लादण्यात येत आहेत. ही अत्यंत अयोग्य बाब आहे. रिफायनरीबाबत आमची भूमिका राजकीय नाही. अत्यंत स्पष्ट अशीच आहे. नाणारला लोकांचा विरोध होता. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आला. हा निर्णय योग्यच होता. त्यानंतर बारसूची जागा योग्य असू शकते, हा मुद्दा पुढे आला. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र दिले. मात्र, एमआयडीसी वा अन्यांना त्यांचे हेच सांगणे होते, की लोकांसमोर याचे सादरीकरण व्हावे, जनतेला मान्य असेल, तरच हा प्रकल्प पुढे गेला पाहिजे. आजही आमची भूमिका कायम आहे. मुळात लाठय़ाकाठय़ा वा हुकूमशाहीने कोणताही प्रकल्प पुढे जाता कामा नये. जनतेशी संवाद झाला पाहिजे. परंतु, हम करे सो कायदा, अशाच वृत्तीने सध्याचे सरकार वागत असल्याची टीका त्यांनी केली.
महाविकास आघाडी भक्कम
महाविकास आघाडी ही कोणत्याही पदासाठी, सत्तेसाठी किंवा खुर्चीसाठी एकवटलेली नाही. ती लोकशाहीच्या संरक्षणासाठी आहे. वज्रमूठ सभा संविधान रक्षणासाठी असून, आघाडी भक्कमपणे काम करीत असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. कुणी काही ट्विट करेल. त्यावर विश्वास ठेवता येत नाही, असे सांगत रश्मी ठाकरे व तेजस ठाकरे यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीचा त्यांनी इन्कार केला. पुण्यातील वेताळ टेकडी वाचली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.








