मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा इशारा : मळा भागात पंपिंग यंत्रणेचे लोकार्पण
पणजी : पावसाला विलंब झाल्यास कशाप्रकारे पाणीटंचाईला सामोरे जावे लागते त्याची झलक यंदा पावसाने दाखवून दिली आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सक्षम पाणी साठवण सुविधा उभारणे हाच त्यावर एकमेव उपाय आहे. त्यामुळे यापुढे कुणीही बंधाऱ्यांच्या उभारणीला विरोध केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला आहे. राजधानीतील मळा भागात पूर पाणी पंपिंग यंत्रणेचे लोकार्पण केल्यानतंर ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री बाबुश मोन्सेरात, महापौर रोहीत मोन्सेरात यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील स्थानिकांना पावसाळ्यात पुरामुळे घरांमध्ये पाणी शिरल्याने त्रास सहन करावे लागत होते. आता या पंपिंग यंत्रणेमुळे यापुढे लोकांना पुराची कोणतीही भीती राहणार नाही. सदर प्रणालीमध्ये 5 पंपसह पूर पाणी पंपिंग स्टेशनचा समावेश आहे. त्यामुळे मळा तलावातून खाडीपर्यंत पाण्याचे पंपिंग होणार असल्याने पाण्याची पातळी राखण्यात मदत होणार आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत 15.90 कोटीचा प्रकल्प
स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत 15.90 कोटी ऊपये खर्च करून हे ’फ्लड वॉटर पंपिंग स्टेशन’ उभारण्यात आले आहे. प्रकल्पांतर्गत पावसाच्या पाण्याचे सर्व ड्रेनेज मळा तलावाला जोडलेले आहेत. तसेच भरतीच्या वेळी पाण्याचा प्रवेश नियंत्रित करण्यासाठी स्वयंचलित गेट लावण्यात आले आहे. या पंपिंग स्टेशनमध्ये ड्रेनेज कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे नाले पुन्हा जोडण्यात येतील. तसेच आल्तिनो डोंगरमाथ्यावरून कोसळणारे सर्व पाणी मळा तलावात आणून सभोवतालच्या परिसरातील ड्रेनेज सुधारण्यात मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सांखळी येथे उभारण्यात आलेल्या पंपिंग स्टेशन नंतरचा राज्यातील हा दुसरा प्रकल्प आहे. याच धर्तीवर आम्ही राज्यात आणखी चार बंधाऱ्यांचे बांधकाम हाती घेणार आहोत. कुर्टी फोंडा येथील नियोजित बंधारा हा त्याचाच भाग होता. परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. मात्र असे प्रकार यापुढे खपवून घेण्यात येणार नाहीत असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. यंदा पाऊस लांबल्यामुळे आम्हाला जलसाठवण क्षमता वाढवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.









