बेळगाव : काँग्रेस रोडवरील तिसरे रेल्वेगेटनजीक नवीन ड्रेनेज लाईन घालण्यासाठी खोदकाम केले जात आहे. त्यामुळे या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी दक्षिण रहदारी पोलिसांनी गोगटे सर्कल येथे बॅरिकेड्स लावून अवजड वाहने गोवावेस ब्रिजवरून वळविली आहेत. मात्र, या बॅरिकेड्समुळे गोगटे सर्कल येथे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
तिसरे रेल्वेगेटनजीक ड्रेनेज लाईन घालण्यासाठी खोदकाम केले जात असल्याने रेल्वे फाटकापासून चन्नम्मानगर क्रॉसपर्यंत रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला ड्रेनेज लाईन घातली जात आहे. मंगळवारपासून या कामाला सुरुवात झाली असून एका बाजूने रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. रेल्वे आल्यानंतर दुसरे रेल्वे फाटक बंद होत आहे. त्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
अवजड वाहने या मार्गावरून ये-जा करीत असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रहदारी पोलिसांनी गोगटे सर्कल येथे बॅरिकेड्स लावले आहेत. त्यामुळे काँग्रेस रोडमार्गे जाणारी अवजड वाहने गोवावेस रेल्वेओव्हरब्रिजवरून पुढे जात आहेत. मात्र, सदर बॅरिकेड्समुळे गोगटे सर्कल येथे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. वाहतूक नियमन करण्यासाठी त्या ठिकाणी रहदारी पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे.









