वाहनचालकांना वळसा घालून करावा लागणार प्रवास : प्रायोगिक तत्त्वावर बॅरिकेड्सची उभारणी; गर्दी नियंत्रणात आल्यास रस्ता कायमचा बंद होणार
प्रतिनिधी / बेळगाव
कॉलेज रोड येथील सन्मान हॉटेलसमोर मंगळवारी रस्त्यावरील दुभाजकाला लागून बॅरिकेड्स उभे करण्यात आले आहेत. कॉलेज रोड व चन्नम्मा चौकामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी रहदारी पोलिसांनी याठिकाणी बॅरिकेड्स उभारले. परंतु यामुळे वाहने वळविण्यासाठी आरएलएस कॉलेजसमोर गर्दी झाली होती. यापुढे गोंधळी गल्लीमार्गे सन्मान हॉटेलकडे जाणाऱ्या नागरिकांना लिंगराज कॉलेज येथून वळसा घालून क्लब रोडला जावे लागणार आहे.
मागील चार दिवसांपासून गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रहदारी पोलिसांनी शहरातील अनेक मार्गांमध्ये बदल केले आहेत. खडेबाजार येथे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर गर्दीच्या ठिकाणी असे बदल केले जात आहेत. सोमवारी संध्याकाळपासून यंदेखूट येथीलही वाहतूक वळविण्यात आली
आहे. समादेवी गल्लीतून गणेशपूर रोडला जाण्यासाठी धर्मवीर
संभाजी चौकातून फिरून जावे लागत आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बॅरिकेड्सची उभारणी
मंगळवारी सन्मान हॉटेलसमोर दुभाजकाला लागून बॅरिकेड्स उभारण्यात आले. याठिकाणी होणारी वाहतूक कोंडी नित्याचीच बाब होती. त्यामुळे ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने बॅरिकेड्स लावण्याचा निर्णय घेतला. परंतु यामुळे वाहनचालकांना वळसा घालून जावे लागणार आहे. त्यामुळे काही वाहनचालकांनी नाराजीही व्यक्त केली.
लिंगराज कॉलेजसमोर वाहनांची गर्दी
सन्मान पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना आता चन्नम्मा चौकमार्गे गोंधळी गल्लीत यावे लागत आहे. यामुळे लिंगराज कॉलेजसमोर वाहनांची गर्दी झाली होती. सध्या तरी प्रायोगिक तत्त्वावर बॅरिकेड्स उभारण्यात आले असले तरी गर्दी नियंत्रणात आल्यास हा रस्ता कायमचा बंद होण्याची शक्यता आहे.