तरुण भारतच्या वृत्ताची दखल : वाहतूक पोलिसांची नियुक्ती
बेळगाव : यंदे खूट ते धर्मवीर संभाजी चौकापर्यंतच्या रोडच्या बाजूला नो पार्किंग झोन आहे. तरीदेखील त्या ठिकाणी वाहने पार्क केली जात होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्या ठिकाणी ट्रॅफिक कोन उभारले होते. पण तरीदेखील वाहनचालक ट्रॅफिक कोन हटवून वाहने पार्क करत असल्याचे वृत्त ‘तरुण भारत’च्या सोमवारच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते. याची दखल घेत पोलिसांकडून पुन्हा त्या ठिकाणी ट्रॅफिक कोन आणि बॅरिकेड्स बसविण्यात आले आहेत. तसेच वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉलेज रोड हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे. कारण या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने वाहनांची ये-जा असते. महाराष्ट्र तसेच गोव्याला जाणारी वाहनेदेखील याच मार्गावरून प्रवास करतात. शाळा, महाविद्यालये आणि दररोज खरेदीसाठी येणारे नागरिक या मार्गावरून प्रामुख्याने ये-जा करतात.
शहराचे पश्चिम प्रवेशद्वार म्हणून यंदे खूटला ओळखले जाते. बेळगाव तालुक्यासह चंदगड भागातील लोक खरेदीसाठी यंदे खूट मार्गेच शहराकडे येतात. मात्र त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जात असल्याने त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. अनेकवेळा वाहतूक कोंडी होण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून पोलिसांनी त्या ठिकाणी ट्रॅफिक कोन उभारले होते. तरीदेखील वाहनचालकांनी कोन हटवून त्या ठिकाणी पार्किंग करण्यास सुरुवात केली होती. ही बाब ‘तरुण भारत’ने उघडकीस आणताच पोलिसांनी दखल घेत त्या ठिकाणी सोमवारी पुन्हा बॅरिकेड्स लावले आहेत.









