कडोली परिसरातील उत्पादक शेतकऱ्यांत नाराजी : मोठ्या प्रमाणात लागवड, बाहेरून आवक होत असल्याने बेळगाव बटाट्याचा भाव घसरला

वार्ताहर /कडोली
उन्हाळी हंगामातील बटाटे काढणी जोरात सुरू झाली असून बटाटा आणि कोबीज कवडीमोल दराने विकला जात असल्याने कडोली परिसरातील उत्पादक शेतकऱ्यांत नाराजी दिसून येत आहे. कडोली परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी हंगामात विशेष करून बटाटा आणि कोबीज पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. बटाटे आणि कोबीज पिकाच्या लागवडीसाठी एकरी 25 ते 30 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. गेले आठ दिवस झाले कडोली, जाफरवाडी, केदनूर, गुंजेनहट्टी, देवगिरी भागात उन्हाळी बटाटे काढणी जोरात सुरू झाली आहे. परंतु बटाट्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरीवर्गात नाराजी दिसून येत आहे. बाहेरील राज्यातून बटाट्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने बेळगाव परिसरातील बटाट्याचा भाव एकदम घसरला आहे. तसेच कडोली परिसरातील दुसऱ्या प्रमुख कोबीज पिकाची अवस्था हीच झाली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापासून कोबीज दरात घसरण झालेली पहावयास मिळत आहे. हे पीक तर पूर्ण नुकसानीचे ठरल्याने कोबीज उत्पादकांत घोर निराशा झालेली दिसत आहे. एकंदरीत कडोली परिसरातील उन्हाळी हंगामात घेण्यात येत असलेली प्रमुख दोन पिके बटाटा आणि कोबीज नुकसानीची ठरल्याने शेतकरी हतबल झाला आहे.









