देव आणि भक्त हे एक अद्भूत नाते आहे. देवासाठी भक्त कोणतेही दिव्य करावयास सज्ज असतो. देवासाठी म्हणून अनेक भक्त सर्वसामान्यांसाठी अशक्य असतात अशी व्रतेवैकल्ये किंवा प्रण करतात. उद्देशपूर्ती होईपर्यंत किंवा आयुष्यभर स्वत: शारिरीक कष्ट सोसतात, पण व्रताची प्रतारणा कधीही करत नाहीत. आपण सर्वसामान्य माणसेही देवावर श्रद्धा ठेवतो, पण अशी शारिरीक झीज सोसत नाही.
मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील गजानन महाजन यांनी असेच एक व्रत घेतले होते. अयोध्यात रामजन्मभूमीच्या स्थानी भव्य राममंदीर जोपर्यंत साकरले जात नाही, तोपर्यंत पादत्राणे उपयोगात आणणार नाही, असे त्यांचे व्रत होते. या व्रताचा प्रारंभ त्यांनी 11 वर्षांपूर्वी केला. इतका प्रदीर्घ कालावधी एकदाही अपवाद न करता ही साधना त्यांनी केली आहे. मार्ग कितीही अवघड असो, हवामान कसेही असो, कोणताही ऋतू असो किंवा स्वत:च्या प्रकृतीची स्थिती कशीही असो, त्यांनी आज सलग अकरा वर्षांहून अधिक काळ या व्रताचे पालन केले आहे. आता अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी भव्य राममंदीराचे निर्माणकार्य झालेले आहे. भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेली आहे. त्यामुळे आपल्या व्रताची सांगता करण्याचा समय आलेला आहे. योग्य वेळी आपण आपल्या गावापासून सायकल प्रवास करुन राममंदीरापर्यंत जाऊ आणि भगवान रामलल्लांचे दर्शन घेऊन आपल्या व्रताची सांगता करु अशी त्यांची योजना आहे. त्यांच्यासारख्या नि:सीम रामभक्तांच्या इच्छाशक्तीनेच हे भव्य राममंदीर साकारले आहे, असा बुऱ्हाणपूर परिसरातील लोकांचा विश्वास आहे. श्रावण मासाच्या अंतिम सोमवारी ते या व्रताची सांगता करणार आहेत.









