यंदाही मुलींचीच बाजी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टक्केवारीत वाढ
प्रतिनिधी/ पर्वरी
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नोव्हेंबर 22 आणि मार्च 23 अशा दोन सत्रांमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 95.46 टक्के लागला असून 19377 पैकी 18497 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 49 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा 2.8 टक्के निकाल वाढला आहे. मुलींची 95.88 टक्के तर मुलांची 95.03 टक्के इतकी आहे. यंदाही उत्तीर्ण टक्केवारीत मुलींनी बाजी मारली आहे.
यावर्षी या परीक्षेत 19377 इतके विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 18497 इतके विद्यार्थी पास झाले. 49 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. यावर्षी 9661 पैकी 9181 इतके मुले पास झाले आहेत. त्यांची टक्केवारी 95.03 इतकी आहे. तर 9716 पैकी 9316 इतक्या मुली पास झाल्या आहेत. त्यांची टक्केवारी 95.88 इतकी आहे.
यंदा सांगे तालुक्याचा सर्वाधिक 98.63 टक्के तर सत्तरी तालुक्याचा सर्वांत कमी 82.98 टक्के निकाल लागला आहे.
मागील वर्षी 92.66 टक्के निकाल लागला होता. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मंडळाची बारावीची परीक्षा नोव्हेंबर 22 आणि मार्च 23 अशा दोन सत्रांमध्ये घेण्यात आली होती. पुढच्या वर्षी परीक्षा एकाच सत्रात घेण्यात येणार आहे. यावर्षी दोन्ही सत्रातील पन्नास-पन्नास टक्के अभ्यासक्रमाचे गुण आणि अंतर्गत मूल्यांकनाचे गुण (20 टक्के) एकत्र करून गुणपत्रक तयार करण्यात आले आहे. अध्यक्ष भगीरथ शेट्यो यांनी काल येथील शिक्षण संचालनालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर करताना ही माहिती दिली. यावेळी सचिव विद्यादत्त नाईक, उपसचिव भरत चोपडे, साहाय्यक सचिव शीतल कदम यांची उपस्थिती होती.
यंदा 75 खासगी विद्यार्थी बसले होते. त्यातील 37 विद्यार्थी पास झाले तर एका विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यांची 49.33 इतकी टक्केवारी झाली आहे. आयटीआय 43 विद्यार्थी बसले होते त्यातील 30 विद्यार्थी पास झाले तर 8 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यांची 69.77 इतकी टक्केवारी झाली आहे. नापास झालेले विद्यार्थी 291 बसले होते. त्यातील 180 पास झाले आहेत. त्यांची 61.86 इतकी टक्केवारी झाली आहे. दिव्यांग विद्यार्थी 141 बसले होते. त्यातील 138 विद्यार्थी पास झाले आहेत. त्यांची 97.87 इतकी टक्केवारी झाली आहे. एनएसक्यू विषय घेऊन बसलेल्या 1229 विद्यार्थ्यांपैकी 1141 पास झाले आहेत. त्यांची 92.84 इतकी टक्केवारी झाली आहे.
यंदाच्या बारावीच्या परीक्षेत सर्वसामान्य गटातील 95.12 टक्के, मागासवर्गातील 96.12 टक्के, अनिसूचित जातीतील 92.41 टक्के तर अनुसूचित जमातीतील 96.90 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. खेळात प्राविण्य मिळाल्यामुळे 3285 विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. पण प्रत्यक्षात त्यातील 84 विद्यार्थी पास झाले आहेत.
कला शाखेचा 95.16 टक्के निकाल लागला असून 4940 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील 4701 पास झाले आहेत तर 227 नापास झाले आहेत. तर 12 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे.
वाणिज्य शाखेचा 96.52 टक्के निकाल लागला आहे. 5980 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 5772 पास झाले 193 नापास झाले आहेत. 15 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे.
विज्ञान शाखेचा 96.19 टक्के निकाल लागला आहे. 5244 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील 5044 पास झाले 189 नापास झाले तर 11 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
व्यावसायिक शाखेचा 92.75 टक्के निकाल लागला आहे. 3213 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील 2980 पास झाले तर 222 नापास झाले आहेत तर 11 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
गेल्या पाच वर्षांचा निकाल 2018 —- 85.84 टक्के ,
2019 —– 89. 59,
2020 — 89.27,
2021 — 99.40 टक्के,
2022 —- 92.66 टक्के असा आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करायची आहे. त्यानी आपल्या शाळेमार्फत योग्य पैसे भरून अर्ज करावा व आपले समाधान करून घ्यावे. तसेच सविस्तर निकाल गोवा शालांत मंडळाच्या वेबसाईटवर मिळणार आहे. पुरवणी परीक्षा जून 2023 च्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष भगीरथ शेटये यांनी दिली आहे.









