ऑनलाईन टिम नवी दिल्ली
लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर आणि कुख्यात पोलीस-किलर मोहम्मद युसूफ दार उर्फ कांतरू याच्यासह त्याच्या तिन साथिदरांना बुधवारी सकाळी काश्मीरमधील बारामुल्ला झालेल्या दहशतवादविरोधी कारवाईत सुरक्षा दलांनी यमसदनी धाडले. बारामुल्ला खोर्यातील अनेक टार्गेट किलिंग्जमध्ये सहभाग घेतल्याने कांतरू सुरक्षा दलांच्या हिटलिस्टवर होता.
मार्चमध्ये बडगाममध्ये विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) मोहम्मद इश्फाक दार आणि त्याचा भाऊ उमर अहमद दार यांच्यासह स्थानिक नागरिक आणि सुरक्षा दलाच्या कर्मचार्यांना मारल्याबद्दल किमान १४ प्रकारच्या एफआयआरमध्ये त्याचे नाव होते. त्याच्यावर मोहम्मद समीर मल्ला या सैनिकाचे अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांच्या नोंदीनुसार छळामुळे ७ मार्च रोजी मोहम्मद समीर मल्ला यांचा मृत्यू झाला होता. तसेच एलईटी कमांडर असलेल्या कांतरूवर गेल्या महिन्यात तगामुल मोहिदिन दार नावाच्या नागरिकाची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुरक्षा दलांना काल रात्री या भागात कांतरूची माहिती मिळाल्यानंतर बडगाम आणि बारामुल्लाच्या सीमेवर असलेल्या गावात दहशतवादविरोधी कारवाई सुरू करण्यात आली. झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी कांतरू आणि अन्य एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. अजून दोन दहशतवादी परिसरात लपून बसले असता सुरक्षा रक्षकांनी कारवाई करून त्यांनाही ठार केले.