पुणे / प्रतिनिधी :
आमचे ‘मिशन भारत’ असून, बारामती महाराष्ट्राच्या बाहेर नाही. मिशन महाराष्ट्रअंतर्गत बारामती आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी येथे स्पष्ट केले.
पुण्यात बोलताना फडणवीस यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, भाजपाने बारामती जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा दौरा केला असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यादेखील बारामती दौरा करणार आहेत. प्रत्येक निवडणूक शेवटची समजून लढल्यास यश नक्की मिळते. दिग्गजांनाही इतिहासात पराभव पत्करावा लागला असल्याकडेही त्यांच्याकडून लक्ष वेधण्यात आले.
‘त्यांच्या’ जागेवर आम्ही कशाला दावा करणार?
आमच्यासोबत ओरिजिनल शिवसेना आहे. शिंदे साहेबांची शिवसेना आमच्यासोबत आहे. त्यांचे जे लोक आमच्यासोबत आले आहेत, त्यांच्या जागेवर आम्ही कशाला दावा करणार, असा सवाल त्यांनी केला. उरलेली शिल्लक सेना असेल, तर शिंदे साहेब, आम्ही ठरवू, अशी प्रतिक्रिया त्यांनी कल्याण लोकसभेच्या जागेबाबत बोलताना दिली.
पतंगबाजी करू नका
आगामी निवडणूक आणि जागावाटपाबाबत भाजपा आणि शिंदे गटाचा फॉर्म्युला ठरल्याबाबत ते म्हणाले, की आम्ही जागा किती लढवायच्या ते तुम्ही ठरवू नका, तुम्ही पतंगबाजी करू नका, आमचे हैदराबाद नाही; तर मिशन मुंबई आहे, असेही त्यांनी सांगितले.








