प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची वकील संघटनेची मागणी
बेळगाव : विजापूर येथील वकील रवी एस. मेळीनकेरी यांचा अत्यंत निर्दयपणे कार अपघात करून खून करण्यात आला आहे. ही निषेधार्ह घटना आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या घटनेचा निषेध नोंदवत येथील बेळगाव जिल्हा बार असोसिएशनकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, कायदामंत्री एच. के. पाटील यांच्या नावे निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना निवेदन सादर करण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला.
ॲड. रवी मेळीनकेरी यांचा कुटील डाव रचून निर्दयपणे खून करण्यात आला आहे. कार अपघात करून त्यांना फरफटत घेऊन जाण्यात आले आहे. त्यांचा अत्यंत निंदनीयपणे खून करण्यात आला आहे. हे अमानवीय कृत्य आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव बार असोसिएशनकडून कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन केले. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. खून झालेल्या ॲड. रवी यांना न्याय मिळवून देण्यात यावा, या घटनेची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. घटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
बेळगाव बार असोसिएशन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असून अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सरकारने कठोर भूमिका घ्यावी. वकिलांना संरक्षण द्यावे, सरकारने वकिलांच्या संरक्षणासाठी कायद्याची सुविधा केली आहे. मात्र त्याचे पालन होताना दिसत नाही. या घटनेची दखल घेऊन वकिलांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. बसवराज मुगळी, ॲड. विजय पाटील, ॲड. शितल रामशेट्टी, सचिव ॲड. यल्लाप्पा दिवटे, ॲड. विश्वनाथ सुलतानपुरी, ॲड. सुमितकुमार अगसगी, ॲड. सुधीर चव्हाण, ॲड. रवी काचगार आदी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यायालयीन कामकाज ठप्प
अॅड. रवी मेळीनकेरी यांच्या खुनाचा निषेध करत बेळगाव वकील संघटनेकडून कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला. त्यामुळे न्यायालयात आलेल्या पक्षकारांना न्यायालयीन कामकाज ठप्प झाल्याने माघारी फिरावे लागले.









