शहरातील विविध सराफी पेढ्यांवर उपलब्ध : दागिने-पूजा साहित्याचे दालन सज्ज
बेळगाव : चौसष्ठ कलांचा अधिपती, बुद्धीची देवता म्हणून गणल्या गेलेल्या गणरायाच्या उत्सवाला म्हणजेच गणेशोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. गणराय ही अशी देवता आहे की ती सर्व जनसमुहाचे आराध्यदैवत आहे. बाप्पा या अल्पाक्षरी शब्दानेच ती आपल्याला माऊलीच्या इतकी जवळची वाटू लागते. म्हणूनच आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतामध्ये कोणतीही उणीव राहू नये याची काळजी त्याचे भक्त घेत असतात.
हा उत्सवच असा आहे की जिथे हौसेला मोल नाही. त्यामुळे अर्थातच बाजारपेठेतही सजावटीचे साहित्य महिनाभर आधीच दाखल झाले आहे. फुले, झिरमिळ्या यांनी सजावट केली जाते. परंतु काही हौशी मंडळी बाप्पासाठी विविध स्वरुपाचे चांदीचे दागिनेही खरेदी करतात. त्यामुळे सराफी पेढ्यांवर असे दागिने आणि पूजा साहित्य यांचे दालन सज्ज झाले आहे. खडेबाजारमधील पोतदार ज्वेलर्समध्ये मोदक हार, दुर्वा हार याबरोबरच जास्वंदी फुले, केवडा, आरती संच, आरती ठेवण्याचा पाट, पान-सुपारी, चांदीचा मोदक, मोदक स्टॅन्ड उपलब्ध आहे. विशेष म्हणजे जानवे आणि जास्वंदी फुलांमध्ये गंगा, जमुना या नावाने नवीन नमुने उपलब्ध आहेत, असे संजय पोतदार यांनी सांगितले. त्याचबरोबर चांदीचेच ड्रायप्रुट्स हे यंदाचे आकर्षण आहे, असे संजीव पोतदार यांनी सांगितले.
श्री गणरायाची मूर्ती चांदीची आहेच, परंतु त्याशिवाय चांदीचे हार, तुळसी हार, जास्वंद हार, मोदक हार, दुर्वा हार, सोंडेवरील नक्षीकाम, डेलीया, गुलाब यांची चांदीची फुले, निरांजन, पान-सुपारी, केळीचे पान, आरतीचे संच उपलब्ध आहेत, असे आशीर्वाद ज्वेलर्सचे संचालक मंजुनाथ कलघटकर यांनी सांगितले. गणपत गल्ली येथील नवरत्न ज्वेलर्समध्ये उत्सवानिमित्त हार, मोदक, दुर्वा, चांदीची नाणी, किरीट यासह अनेक अलंकार उपलब्ध आहेत. भीमा ज्वेलर्समध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध प्रकारचे हार, फुले यांच्याबरोबरच कडबु हार, आंब्याची पाने, ऊस किंवा केळीचे झाड, हत्ती, चांदीचे नारळ याबरोबरच गौरीचे मुखवटे आणि मूर्ती यांची खरेदी सुरू आहे.
अल्पदरात उपलब्ध…
पी. एन. गाडगीळ पेढीमध्ये सर्व आभुषणांसह किरीट, परशु, त्रिशुळ, दुर्वाजोडी, केवडा, जानवे हे दागिने आहेत. याशिवाय मीना काम केलेले हार आलेले आहेत. विशेष म्हणजे चांदीचा उंदीर, चांदीची पाच फळे हेसुद्धा येथे उपलब्ध आहेत. मलाबार ज्वेलर्समध्ये उपरोक्त दागिन्यांबरोबरच हलक्या वजनाचे व सर्वांना परवडतील, असे दागिने उपलब्ध आहेत.









