वार्ताहर /सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागात मंगळवारी ढोल-ताशांच्या गजरात व गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात लाडक्या गणरायाचे आगमन झाले. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, मुतगा, शिंदोळी, बसरीकट्टी, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, पंतबाळेकुंद्री, मोदगा, मारिहाळ, सुळेभावी आदी गावात मंगळवारी सकाळपासूनच घरगुती गणपती आणण्यात येत होते. दुपारपर्यंत घरगुती गणपती मूर्ती नेतानाचे चित्र गावोगावी पाहावयास मिळत होते. दुपारनंतर सार्वजनिक गणपती आणण्यासाठी कार्यकर्ते मंडपात जमू लागले. ट्रॅक्टर, टेम्पो व ट्रकमधून सार्वजनिक गणपती आणण्यात येत होते. जास्तीत जास्त मंडळांनी आगमन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांवर भर दिला होता. ढोल, ताशा, लेझीम पथक व भजनी मंडळे यांचा मिरवणुकीत सहभाग पहावयास मिळाला. सार्वजनिक मंडळांनी मंडपामध्ये आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेशमूर्तींचा आगमन सोहळा सुरू होता.









