प्रतिनिधी /बेळगाव
कोणतेही उत्सव केवळ साजरे करण्यासाठीच नव्हे तर परस्परांमध्ये, दोन धर्मांमध्ये सलोखा साधण्यासाठी सुद्धा असतात. बेळगावच्या गणेशोत्सवामध्ये तर याचे प्रत्यंतर सातत्याने येते. गणरायाच्या आगमनादिवशीच दक्षिण विभागाच्या वाहतूक पोलिसांनी या उत्सवात मुस्लीम बांधवांना सहभागी तर करून घेतलेच, इतकेच नव्हे तर श्रीमूर्ती घेऊन येण्याचा मानही दिला व सर्वधर्म समभावाचे दर्शनही घडविले.
वाहतूक पोलीस विभाग सातत्याने वेगवेगळे स्वागतार्ह उपक्रम राबवत असते. यावषी पोलीस अधिकाऱयांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱयांनी आणि मुस्लीम बांधवांनी मिरवणुकीने गणपती आणून त्याची प्रति÷ापना केली. या पोलीस स्टेशनमध्ये हिंदू व मुस्लीम धर्माचे कर्मचारी कार्यरत आहेत. येथील अकबरसाब अलीखान, शानूर दलाईत, शिराज शेख, सिकंदर बेनकनहळ्ळी, सिद्दू लोधी, मार्सेल गोन्साल्वीस, एएसआय लक्ष्मण सारापुरे अशा विविध धर्मियांनी श्रीमूर्ती आनंदात हाती घेऊन मिरवणुकीत भाग घेतला.
एसीपी शरणप्पा, पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर, पीएसआय कत्तीकर, केंपण्णावर, एएसआय लक्ष्मण सारापुरे, अण्णीगेरी, उपारी, हसलण्णवर, हवालदार रवी सी., जयराम माने व अन्य उपस्थित होते.









