श्री गणपती हा आबालवृद्धांचा लाडका देव आहे. तो सर्वांच्या घरी प्रेमाने कुळाचाराप्रमाणे मुक्कामाला येतो. गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशी असे दहा दिवस तो भक्तांघरी आनंदाने राहतो. भक्त छोट्या पत्र्याच्या घरातले असोत किंवा राजमहालात राहणारे असोत त्याच्यासाठी सर्व सारखेच असतात. त्याचे कृपाछत्र समान असते. देवघरातले देव पिढ्या न् पिढ्या घरात वास्तव्याला असतात. त्यांची पूजाअर्चा, कुळाचार वेगळे, परंतु स्वयंभू असणारा गणपती बाप्पा वाजत गाजत निर्गुणातून सगुणात येणारा, पाहुणचार स्वीकारणारा, घरातलाच एक होऊन राहणारा एकमेव देव. म्हणून तर समर्थ रामदास स्वामी गणपतीच्या आरतीमध्ये म्हणतात- ‘दास रामाचा वाट पाहे सदना’. त्याचा वास म्हणजे घरात-दारात भरून उरलेला आनंद. भजन-कीर्तन, मोदक प्रसाद आणि सवे असणारा उंदीर, साप यामुळे घर कसे उत्साहाने ओसंडत असते. श्री गणपती या देवतेची अनेक वैशिष्ट्यो आहेत. त्यातले प्रमुख म्हणजे तो मातृभक्त आहे. अर्थात आईचा मुलगा आहे. पार्वतीमातेच्या छायेत तो निवांत आहे
गणपतीबाप्पा भक्तांघरी येण्यापूर्वी पार्वतीमातेचा एक फेरा असतो. ज्या घरी बाप्पा येणार ते घर माझ्या बाळासाठी योग्य आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी ती घरोघरी जाते. त्याला स्वर्णगौरी व्रत असे म्हणतात. भाद्रपद शुद्ध तृतीयेला देवी पार्वती येते म्हणून त्याआधी स्त्रियांची लगबग असते. घर झाडूनपुसून स्वच्छ ठेवावे लागते. कारण गणपतीला अस्वच्छता खपत नाही. फराळाचे डबे सज्ज ठेवणे, मखर सजवणे, घरात भांडणे होऊ नयेत ही दक्षता घेणे. गणपती ही शांत देवता आहे. त्याला कलह आवडत नाही. पार्वती माता आनंदित व्हावी म्हणून तिच्यासाठी निरनिराळे पदार्थ करून साडीचोळीने तिची ओटी भरण्याची साग्रसंगीत तयारी गृहिणी करतात. तिच्यासाठी म्हणून ठेवलेला साज शृंगार नंतर एका सुवासिनी स्त्राrला त्या देतात. जे घर पार्वतीला पसंत पडते त्या घरात ती आपल्या मुलाला जाण्याची, तिथे राहण्याची परवानगी देते. पार्वतीचा हा पुत्र अनोखा स्वयंभू होय. पृथ्वीवरील मातीचा पहिला सगुण आविष्कार आहे. तो आदि देव आहे. त्याच्यापासून नंतर देवसृष्टी निर्माण झाली. म्हणून शंकर-पार्वतीच्या विवाहात प्रथम श्री गणेशाचे पूजन झाले. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात- ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा..’ निर्गुणातून गणपती प्रथम साकार झाला म्हणूनच त्याला अग्रपूजेचा मान आहे.
श्री गणपती हा मातीचा असावा व मातीच्या गणेशाचेच घरी पूजन करावे असा संकेत आहे. मातीमधून संपूर्ण जीवसृष्टी जन्माला आली. कलियुगामध्ये जिवाचा प्राण हा अन्नामध्ये आहे. प्राण प्रदान करते ती माती. मातीमध्ये श्वसनक्षमता आहे. घरी बाप्पाची स्थापना करताना प्राणप्रतिष्ठा करतात. मातीच्या मूर्तीत बाप्पा साक्षात अवतरतात व कृपा करतात. गणपतीचा गजर करताना ‘मंगलमूर्ती मोरया’ असे म्हणतात. शरीरामधील पंचज्ञानेंद्रियांमध्ये डोळे महत्त्वाचे. दृष्टीचा प्रभाव संपूर्ण जीवनावर पडतो. दृष्टीमध्ये भाव असतात.
सकारात्मक-नकारात्मक दृष्टी व्यवहारात जगताना स्वत:चे वर्चस्व सिद्ध करते, तर अलौकिकातील आध्यात्मिक दृष्टी वाईट संचित संपवते. महाभारतामध्ये एक घटना आहे. भीमाने धृतराष्ट्राच्या मांडीवर गदाप्रहार करू त्याचा वध केला तेव्हा शंभर पुत्रांची माता असूनही शेवटी निपुत्रिक झालेली गांधारी संतप्त झाली. तेव्हा तिथे प्रत्यक्ष वेदव्यास प्रकट झाले आणि पांडव गांधारीच्या दृष्टीला पडण्यापूर्वीच त्यांनी तिला क्रोध आवरण्याचा सल्ला दिला, तेव्हा व्यासांच्या म्हणण्यानुसार तिच्या उसळून आलेल्या क्रोधाला प्रतिबंध झाला तरी तिने जेव्हा आपले पट्टी बांधलेले डोळे युधिष्ठिराकडे वळवले तेव्हा तिच्या डोळ्यात प्रकटलेला क्रोधाग्नी आरपार गेला आणि युधिष्ठिराच्या पायाची नखे काळी ठिक्कर पडली. पांडवांच्या प्राणांवरचे संकट नखावर जाऊन निभावले. देवाला आणि संतांनासुद्धा दृष्ट लागते. दृष्टीत जसे विष असते तसे अमृतही. गणपतीबाप्पाच्या दृष्टीमध्ये अमृत आहे. त्याची अमृतमय दृष्टी भक्तांवर पडताच त्यांचे दैन्य नाहीसे होते व ते बुद्धिमान व संपन्न होतात.
सर्वांचा एक नित्याचा अनुभव असतो की घरामध्ये कोणतीही पूजा असो, घरातली व आलेली पाहुणेमंडळी आपापल्या कामात व्यस्त असतात. पूजेचे मंत्र त्यांच्या कानावर पडत असतात मात्र आरतीची वेळ झाली की सगळेजण, अगदी गृहिणीदेखील स्वयंपाकघरातील कामे थांबवून आरतीसाठी हजर होतात. गणपती उत्सवातील आरती हे महाराष्ट्राचे वैभव आहे. समर्थ रामदास स्वामींनी मोरगाव येथे रचलेली श्री गणपतीची ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची’ ही आरती घराघरात लहानपणापासून मुलांच्या कानावर पडून त्यांच्या मनावर एक संस्कार घडवते. ती सर्वांना तोंडपाठ असते. सद्य काळात जगण्याला वेग आहे. इथे थांबायला कुणालाही वेळ नाही. समर्थ रामदास स्वामी द्रष्टे संत होते. म्हणूनच ते म्हणाले, ‘अखंड कामाची लगबग । उपासनेला लावावे जग’. आरती ही जर मनोभावे म्हटली तर फक्त काही मिनिटेच लागतात व ती एक श्रेष्ठ उपासना ठरते. ते शब्दसंजीवन आहे. ‘जय देव जय देव जय मंगलमूर्ती’ असा तीन वेळा जयजयकार करून समर्थ म्हणतात, ‘दर्शनमात्रे मन कामनापूर्ती’. गणपतीची दृष्टी भक्तांवर स्थिरावली की त्यांचे मन शून्य होते. मनाचा हव्यास हा कधीही शमणारा नाही. देह सोडायची वेळ आली तरी शेवटची इच्छा उरतेच. एवढेच कशाला? मरणानंतर माझ्यासाठी अमुकतमुक करा असेसुद्धा माणूस सांगून जातो. गणपतीबाप्पाच्या उपासनेमुळे मनाचे विकार शमतात. ‘लंबोदर पीतांबर फणीवर बंधना’ असे समर्थ म्हणतात. शिवशंकराचे कुटुंब प्राण्यांवर प्रेम करणारे. शिवाजवळ साप, नंदी, कासव आहे. पार्वतीजवळ सिंह, कार्तिकेयाजवळ मोर. गणपतीजवळ उंदीर. एकमेकांचे शत्रू असलेले हे प्राणी या कुटुंबात मात्र गुण्यागोविंदाने राहतात. गणपतीच्या पोटावर सापाचे बंधन, तर मांडीखाली उंदीर आहे. गणपतीबाप्पा सांगतो की निसर्गाशी वैर करू नका. हिंसा करू नका. शेवटी आरतीत म्हटले आहे की ‘निर्वाणी रक्षावे’. हे गणराया, तू आमचा अंतकाळ सांभाळ. आम्हाला सुंदर मरण दे. जीवनउत्सवाची सांगता आनंदमय असू दे. या देहाची ज्योत तुझ्या आत्मज्योतीमध्ये विलीन व्हावी असे आचरण आमच्याकडून घडव असा आशीर्वाद दे. आरती ही एकट्याने करायची नसून समूहध्वनीने करायची. कारण त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. समर्थ रामदास स्वामींनी रचलेली गणपती बाप्पाची आरती जर श्रद्धा, निष्ठा, प्रेम ओतून म्हटली तर ती एक श्रेष्ठ उपासना ठरते यात शंका नाही.
-स्नेहा शिनखेडे








